- बनावट कागदपत्रांच्या आधारे लाटली पीएमआरडीएची सदनिका..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी दि. ९ ऑक्टोबर २०२६) :- उत्तर प्रदेशातील रहिवासी असतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्राचा रहिवासी दाखला मिळवून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद दानिश अब्दुल माजिद शेख (वय ४५, सेक्टर १२, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात ३९ वर्षीय महिला आणि खराळवाडी, येथील इरफान शेख या एजंटाचाही समावेश आहे.
याबाबत अशोक शिवाजी भोगल (वय ३७,) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २१ मे २०२१ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत भोसरीतील व्याघ्रगड सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद दानिश शेख याचा जन्म उत्तर प्रदेशात झाला असताना, त्याने पुण्यातील खडकी येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीचे शिक्षण घेतल्याचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच त्याचे वडील अब्दुल माजिद फसीब यांच्या नावाचा धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगर परिषद शाळेचा निर्गम उतारा बनावट पद्धतीने तयार करून घेतल्याचा आरोप आहे. यासाठी इरफान शेख या एजंटची मदत घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपीने २०२१ मध्ये हवेली तहसील कार्यालयातून महाराष्ट्राचा रहिवासी दाखला मिळवल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या पत्नीने महाराष्ट्रातील नागरिकांसाठी असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी या दाखल्याचा वापर केला. त्यातून पीएमआरडीएच्या माध्यमातून भोसरी येथील व्याघ्रगड सहकारी गृहनिर्माण संस्थेतील बी/२० इमारतीमधील सदनिका क्रमांक ९०४ स्वतःच्या नावावर करून घेत शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मणेर आणि पोलीस उपनिरीक्षक मिसळ करीत आहेत.

















