न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरातील ९ वी ते १२ वीच्या शाळा सोमवारी २३ नोव्हेंबरला उघडणार होत्या; परंतु शिक्षकांची कोरोना तपासणी आणि नियोजन करण्यासाठी महापालिकेने ३० नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. माध्यमिक शाळांच्या किती शिक्षकांची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह येते आणि किती पालक संमतिपत्रक देतात, यावरच शाळा उघडणार की नाही, हे ठरणार असल्याची स्थिती आहे.
सध्या तरी किती शिक्षकांची तपासणी झाली आणि किती पॉझिटिव्ह आले याची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. त्याचबरोबर संमतिपत्र देण्यास पालक सध्या इच्छुक नसल्याचे दिसून येते. महापालिकेच्यावतीने आणि शाळा व्यवस्थापनाची तयारीही जवळपास पूर्ण होत आली आहे. त्याचबरोबर मागील सहा दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
मागील सहा दिवसांत ३० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या दिवसापर्यंत किती रुग्ण वाढतील यावरदेखील शाळा उघडणार की नाही, याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. पिंपरी – चिंचवड शहरासह उपनगरांतील शाळा नेमक्या कधी सुरु होतील, याबद्दल संभ्रम आहे.