न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसें.) :- पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येते. तसेच यातून बचत गटांच्या उत्पादनांची माहिती शहरातील नागरिकांना होते. बचतगटातील महिलांना व्यवसाय, विक्री कौशल्ये, बाजार, व्यवहार या गोष्टी जवळून अनुभवता येतात. त्याच उद्देशातून ही जत्रा भरविण्यात येते.
महापालिकेच्या वतीने ४ ते ८ जानेवारी दरम्यान सांगवी येथील पीडब्लूडी मैदानावर पवनाथडी जत्रा भरविण्यात येणार आहे. या जत्रेमध्ये महिला बचतगटांना वस्तू विक्रीकरिता स्टॉल उपलब्ध करुन देण्यासाठी आज शनिवार (दि. २९) रोजी महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
यावेळी महापौर राहूल जाधव, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, सदस्या आरती चोंधे, स्वाती काटे, मोरेश्वर शेडगे यांच्यासह ४२ महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
यात ८२० अर्जदारांपैकी ८१३ अर्जदार पात्र ठरले असून, या अर्जदारांना शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीसाठी हे स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दहा बाय दहा अकाराचे ४५० स्टॉल्स अर्जदार महिला बचत गटांना वाटप केले जाणार असल्याचे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी सांगितले आहे.