- सभापती अभिषेक बारणेंचे निर्देश..
- नवनियुक्त अभियंत्यांना दिला शहराची भौगोलिक माहिती समजून घेण्याचा कानमंत्र…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. 08 ऑक्टोबर 2026) :- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने अधिक गतिमान पद्धतीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश महापालिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिले. विशेषतः महापालिकेत नव्याने नियुक्त झालेल्या अभियंत्यांनी कार्यालयीन कामकाजापुरते मर्यादित न राहता शहराची भौगोलिक रचना, सुरू असलेले प्रकल्प, अर्धवट राहिलेली कामे आणि रखडलेल्या प्रकल्पांची कारणे प्रत्यक्ष समजून घ्यावीत, अशी सूचना त्यांनी केली.
महापालिकेच्या सर्व अभियंत्यांची बैठक घेत बारणे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित कामांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. शहराची माहिती प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन घ्या आणि समस्या सोडविण्यासाठी मार्ग शोधा. नागरिकांचा एकही प्रश्न अनुत्तरित राहता कामा नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. सध्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने धोरणात्मक निर्णय घेण्यावर मर्यादा असल्या तरी नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर आवश्यक ती कार्यवाही थांबता कामा नये, असे बारणे यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्यात निर्माण झालेल्या समस्यांवर लक्ष
पावसामुळे निर्माण झालेले रस्त्यांवरील खड्डे, खराब व खचलेले रस्ते, रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज लाईनच्या समस्या, ओव्हरफ्लो होणाऱ्या स्टॉर्म वॉटर लाईन्स, उद्यानांची देखभाल, झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी आणि विस्कळीत पाणीपुरवठा अशा विविध नागरी प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना बारणे यांनी दिल्या.
रखडलेल्या प्रकल्पांवर उपाय-योजना
महापालिकेचे जे प्रकल्प सुरू आहेत, जे प्रकल्प अर्धवट आहेत किंवा विविध कारणांमुळे रखडले आहेत, त्यांचा स्वतंत्र आढावा घेऊन अडथळ्यांची कारणे शोधावीत. संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच, नव्याने नियुक्त झालेल्या अभियंत्यांनी शहरातील प्रमुख रस्ते, प्रकल्प, जलवाहिन्या, ड्रेनेज व्यवस्था, उद्याने आणि इतर महत्त्वाच्या नागरी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून आपल्या कार्यक्षेत्राची संपूर्ण माहिती करून घ्यावी. त्यामुळे भविष्यात काम करताना अडचणी कमी होतील आणि नागरिकांच्या तक्रारींवर जलद निर्णय घेणे शक्य होईल, असे बारणे यांनी सांगितले.
नागरिकांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य
महापालिका प्रशासनाचा केंद्रबिंदू नागरिक असला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक अभियंता आणि अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील समस्या नियमितपणे जाणून घेऊन त्यावर वेळेत कार्यवाही करावी. नागरिकांचा प्रश्न प्रलंबित ठेवण्याऐवजी त्यावर उपाय शोधण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांनी स्वीकारावी, अशी सूचना बारणे यांनी केली. बैठकीस पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व अभियंते आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


















