- प्रशासनाला दिला स्वच्छता, अतिक्रमणमुक्ती आणि वाहतूक व्यवस्थेचा कृती आराखडा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. 08 ऑक्टोबर 2026) :- चिंचवड मतदारसंघातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच कचरा, अतिक्रमणे, अनधिकृत फलक, आठवडे बाजार आणि हॉकर्सच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी प्रशासनाला कृती आराखडा निश्चित करुन दिला. चिंचवड मतदारसंघ ‘झिरो गार्बेज झोन’ करण्याचा निर्धार करत, वारंवार कचरा साचणारे ‘क्रॉनिक स्पॉट’ शोधून ते कायमस्वरूपी कचरामुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले.
आमदार जगताप यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी (दि. ८) चिंचवड मतदारसंघातील विविध नागरी प्रश्नांबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी स्वच्छता, अतिक्रमण, हॉकर्स झोन आणि आठवडे बाजारांच्या नियोजनाचा आढावा घेत नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला ड व ज क्षेत्रीय कार्यालयाच्या अश्विनी गायकवाड, ह क्षेत्रीय कार्यालयाचे संतोष कोराड, ग क्षेत्रीय कार्यालयाचे मुकेश कोळप आणि ब क्षेत्रीय कार्यालयाचे गोरखनाथ निम्हण उपस्थित होते.
‘क्रॉनिक स्पॉट’वर आता कायमस्वरूपी उपाय…
चिंचवड मतदारसंघात ज्या ठिकाणी वारंवार कचरा साचतो, अशा ‘क्रॉनिक स्पॉट’ची क्षेत्रनिहाय यादी तयार करून तेथे केवळ कचरा उचलण्यापुरती कारवाई न करता कचरा पुन्हा साचणार नाही, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे जगताप यांनी स्पष्ट निर्देश दिले. सार्वजनिक ठिकाणे, स्मशानभूमी परिसर आणि सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता राखण्याबरोबरच स्वच्छतेसाठी नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि प्रत्यक्ष कामाची तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अतिक्रमण, अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा
उड्डाणपूल, भिंती आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे स्टिकर्स चिकटविणाऱ्यांवर तसेच बेकायदेशीर होर्डिंग लावणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, असे निर्देश जगताप यांनी दिले. नागरिकांच्या सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यावरही त्यांनी भर दिला.
हॉकर्स झोनसाठी नियोजनबद्ध धोरण
हॉकर्स झोन निश्चित करताना केवळ जागा उपलब्ध आहे म्हणून निर्णय न घेता तांत्रिक बाबी, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता यांचा विचार करावा, अशी सूचना जगताप यांनी केली. तसेच दिव्यांग, महिला, विधवा आणि परितक्ता यांना विशेष प्राधान्य व आरक्षणाचा विचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच, पदपथ किंवा मोकळ्या शासकीय जागांवर आठवडे बाजार भरू नयेत, याची दक्षता घेण्याचे निर्देश देतानाच खासगी जागेत बाजार भरविणाऱ्या आयोजकांनी पुरेशी पार्किंग व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सणासुदीच्या काळात गैरसोय नको
सणासुदीच्या काळात वाढणारी नागरिकांची वर्दळ लक्षात घेऊन कचरा, वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आगाऊ नियोजन करावे, असेही आमदार जगताप यांनी सांगितले. चिंचवडची स्वच्छता, वाहतूक आणि नागरी व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता परिणामकारक आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी स्पष्ट भूमिका आमदार शंकर जगताप यांनी बैठकीत मांडली.


















