- बनावट परिवहन अॅपच्या माध्यमातून सुमारे १० लाखांची ऑनलाइन फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ८ ऑक्टोबर २०२६) :- वाहनावर थकीत दंड असल्याचे भासवून बनावट संदेश पाठवत परिवहन विभागाच्या नावाने बनावट अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून भोसरीतील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल ९ लाख ९९ हजार ९७१ रुपये परस्पर ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आले. ही घटना २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजून दहा ते सात वाजून तेरा मिनिटांच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी वनायक शंकर पाटील (वय ४५, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ७ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांच्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तीने ‘तुमच्या वाहनावर थकीत दंड आहे. रक्कम न भरल्यास प्रकरण न्यायालयात पाठविण्यात येईल’ अशा आशयाचा संदेश पाठविला. त्यामध्ये vehicles.mparivahan.autos ही वेबसाइट परिवहन विभागाची असल्याचे भासवून Mparivahan.apk हे बनावट अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडण्यात आले.
पाटील यांनी हे अॅप उघडल्यानंतर त्यांच्या मोबाइलवर ओटीपीसंदर्भातील संदेश येऊ लागले. त्याचवेळी त्यांच्या बँक खात्यातून सहा व्यवहारांद्वारे एकूण ९,९९,९७१ रुपये त्यांच्या संमतीशिवाय दुसऱ्या बँक खात्यात ऑनलाइन हस्तांतरित झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खडसे व पोलीस निरीक्षक मिसाळ करीत आहेत.


















