- घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक डॉ. विजयकुमार पाटील यांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ८ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्याच्या कलम २८(२) अन्वये १२ ऑक्टोबर २०२६ रोजी ग. दि. माडगुळकर सभागृह, प्राधिकरण, निगडी येथे बिजलीनगर, चिंचवडेनगर आणि वाल्हेकरवाडी परिसरातील रहिवासी तसेच एचसीएमटीआर आणि रिंग रेल्वे प्रकल्पबाधितांची महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीला नोटीस मिळालेल्या नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आपली बाजू भक्कमपणे मांडावी, असे आवाहन घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले आहे.
कालबाह्य प्रकल्पांच्या नावाखाली नागरिकांची घरे व जमिनी बाधित होण्याची शक्यता असल्याने प्रशासनासमोर कायदेशीर आणि तांत्रिक बाजू प्रभावीपणे मांडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी सुनावणीला येताना पूर्वी दाखल केलेल्या हरकतीची प्रत, पोचपावती किंवा नोटीस, खरेदीखत, पीआर कार्ड अथवा सदनिका वाटप पत्र, अद्ययावत मालमत्ता कर पावती, वीज बिल तसेच उपलब्ध नकाशे व घराचे फोटो सोबत आणावेत.
आपले म्हणणे स्पष्टपणे मांडता यावे यासाठी घराचे क्षेत्रफळ, कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि वास्तव्याचा पुरावा यांसह महत्त्वाचे मुद्दे लेखी स्वरूपात तयार ठेवावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील एचसीएमटीआर बाधितांच्या वतीने घर बचाव संघर्ष समितीचे अंतिम हरकत निवेदन नियोजन समितीकडे सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधितांनी स्थानिक समन्वयकांशी संपर्क साधून निवेदनावर नाव व स्वाक्षरी करावी, असे पाटील यांनी सांगितले.
“ही आपल्या हक्काच्या घरांच्या अस्तित्वाची लढाई आहे. एकजुटीने आणि पुराव्यांसह प्रशासनासमोर बाजू मांडणे गरजेचे आहे. सर्व बाधितांनी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सभागृहात उपस्थित राहावे,” असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.


















