- बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, जलतरण, नेमबाजी आणि जिम्नॅस्टिक्समध्ये घवघवीत यश
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ८ ऑक्टोबर २०२६) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत आयोजित पुणे जिल्हा विभागीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, जलतरण, नेमबाजी आणि कलात्मक जिम्नॅस्टिक्स या विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.
पुणे जिल्हा आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिभा महाविद्यालयाच्या महिला बॅडमिंटन संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. या विजयी संघातील एस.वाय.बी.ए.च्या विद्यार्थिनी कु. अर्पिता आर्डे हिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत तिची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
वेटलिफ्टिंग स्पर्धेतही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. एफ.वाय.बी.कॉमचा विद्यार्थी हर्षद चौधरी याने ९५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. तर वेदांत धोरे याने ६० किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवला. या दोन्ही खेळाडूंची पुणे जिल्हा संघातून आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जलतरण स्पर्धेत एस.वाय.सी.एस.चा विद्यार्थी प्रथमेश कदम याने २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले.
दहा मीटर एअर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेतही महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अचूक लक्ष्यवेध साधत उल्लेखनीय यश मिळवले. एस.वाय.बी.ए.च्या कु. भक्ती नारायणकर हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर बी.कॉम. (बी.एम.)च्या कु. राजनंदिनी यादव हिने तृतीय क्रमांक मिळवला. या दोन्ही खेळाडूंची पुणे जिल्हा संघातून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कलात्मक जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात एफ.वाय.बी.कॉमचा विद्यार्थी सार्थक विजय नलावडे याची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
याशिवाय नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत सोहन गोळे, अथर्व शिंदे, केतन मोरे, शिवप्रसाद संगमे आणि स्नेहल गुप्ता या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे यशस्वी प्रतिनिधित्व केले.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, क्रीडा संचालक प्रा. संकेत सावेकर आणि प्रा. पांडुरंग इंगळे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील आंतरविभागीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला निश्चितच बळ मिळाले असून, इतर विद्यार्थ्यांसाठी हे यश प्रेरणादायी ठरत आहे, असे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी सांगितले.


















