न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ८ ऑक्टोबर २०२६) :- गंभीर गुन्ह्यात गेल्या चार वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-४ च्या पथकाने जांभुळगाव येथून शिताफीने अटक केली. नारायण सोपान दाभाडे (वय ४१, रा. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दाभाडे याच्याविरुद्ध उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तो गेल्या चार वर्षांपासून पोलिसांना हवा होता.
दाभाडे याच्यावर यापूर्वी मोक्का, खुनाचा प्रयत्न, दुखापत, खंडणी, अपहरण, मारामारी, अग्निशस्त्राचा वापर, ज्वेलर्स लुटण्याचा कट, दरोड्याचा प्रयत्न आणि गांजा विक्री यांसारखे एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तळेगाव दाभाडे व मावळ परिसरात त्याची दहशत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या युनिट-४ कडून फरार आरोपींचा शोध सुरू होता. यावेळी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दाभाडे हा जांभुळगाव परिसरात असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिस पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलिस उपायुक्त (गुन्हे) रोहीदास पवार आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहायक पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलिस हवालदार असवले, सोनटक्के आणि पोलिस शिपाई मुंडे यांच्या पथकाने केली.


















