- महापालिका प्रवेशद्वारासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात एका दिवसाआड सुरु असलेला पाणीपुरवठा रद्द करून नोव्हेंबर अखेरपासून टप्या-टप्प्याने दररोज पाणीपुरवठा केला जाईल, अशी ग्वाही सत्ताधारी भाजपने दिली होती. परंतु, ती डेडलाईन प्रशासन पाळू शकले नाही. याला भाजप जबाबदार आहे.
सत्ताधारी भाजप शहरावसीयांना दररोज पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि प्रशासनाच्या विरोधात आज बुधवारी (दि. १५) रोजी महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक अजित गव्हाणे, नाना काटे, मयूर कलाटे यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी आयुक्तांना मागणीचे निवेदन देण्यात आले. प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘भाऊ, दादा पैसे खाई, शहराला आमच्या पाणी नाही, ओ माई पाणी नाही’, ‘सत्ताधारी भ्रष्टाचारी भाजपचे करायचे काय खाली डोके वर पाय’ अशा जोरदार घोषणा दिल्या.