न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२५) :- जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना दापोडी येथे घडली. यामध्ये दोन्ही गटातील आरोपींनी कोयते हवेत फिरवत परिसरातील नागरिकांना धमकी दिली. आरोपींपैकी एकाने आपण दापोडीचा डॉन तर एकाने दापोडीचा भाई असल्याचे म्हणत नागरिकांना धमकावले.
सलमान अकबर शेख (वय २६, रा. गुलाबनगर, दापोडी) याने दापोडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संजय राजू पातारे (वय २४, रा. दापोडी) याला अटक केली आहे. फिर्यादी हा काम संपल्यानंतर घरी जात असताना आरोपीने जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्याने मारहाण केली. आरोपीने कोयता हवेत फिरवून मदतीस येणाऱ्या लोकांना ‘खबरदार कोणी मध्ये आले तर, मी दापोडीचा डॉन आहे, डॉन झुकता नही झुकाता है,’ असे म्हणत लोकांना धमकावले.
तर संजय राजू पातारे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी सलमान अकबर शेख (वय २६), सत्यम गणेश जाधव (वय २०) या दोघांना अटक केली आहे. फिर्यादी कामावरून घरी जात असताना आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. कोयता हवेत फिरवत ‘खबरदार कोणीमध्ये आले तर, मी दापोडीचा सलमान भाई आहे,’ असे म्हणत लोकांना धमकावले.