न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १९ एप्रिल २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाईला सुरूवात केली आहे. पहिल्या टप्प्यात खेड तालुक्यात ही कारवाई करण्यात आली. आता मावळ, मुळशी, हवेली आदी तालुक्यातही ही कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर योग्य पडताळणी करून कारवाई केली जाणार आहे.
पीएमआरडीए प्रशासनाकडून अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई केली होती. च-होली (ता. खेड) या ठिकाणी चार वेगवेगळी अनधिकृत प्लॉटिंग काढण्यात आली. यात ५४ हजार चौरस फूट परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली. गावागावातील होर्डिंगचे सर्वेक्षण त्याचबरोबर अशा प्रकारचे अनधिकृत प्लॉटिंगची माहिती देखील गोळा करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून अशा प्लॉटिंग विक्रीवर चाप बसणार आहे.
याबाबत प्राधिकरणातील बांधकाम परवानगी विभागातील परवानगी मिळाल्या असल्यास त्याची खात्री करून जागेची खरेदी विक्री करावी, असे आवाहन पीएमआरडीएच्या वतीने करण्यात आले आहे.
पीएमआरडीए हद्दीतील खेड, आळंदी, चाकण, वडगाव घेनंद, चाकण या पट्ट्यामध्ये त्याचप्रमाणे मावळ आणि मुळशी या तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्लॉटिंग होत आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे उकळून अनधिकृत प्लॉट त्यांच्या माथी मारले जातात. यानंतर अशा जागेवर उभारण्यात आलेले बांधकाम अनधिकृत ठरून भविष्यामध्ये त्या विरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापूर्वीच अशा अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाईची मोहीम उभारण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
“खेड तालुक्यातील अनधिकृत प्लॉटवर कारवाई केली आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून पुढील अनधिकृत प्लॉट असल्याचे पाहून कारवाई केली जाणार आहे.”
– दीप्ती सूर्यवंशी, सहआयुक्त अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभाग…












