- तब्बल बारा हजार कोटींच्या पर्यायी रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यासोबत बैठक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १९ एप्रिल २०२५) :- सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शिरूर-खेड-कर्जत-पनवेल, असा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या कामासाठी १२ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, यामुळे पुणे महानगर परिसरातील कोंडी कायमची दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे यासंदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागाच्या आढावा बैठकीत भोसले बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, मुख्य अभियंता अतुल चव्हाण तसेच विभागातील सर्व अधीक्षक व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
भोसले म्हणाले, या रस्त्यामुळे पुणे शहरातील शिक्रापूर-चाकण तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी संपणार आहे. त्यामुळे पुणे महानगर परिसरासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे.
या संदर्भात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे. हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी येथे आठवडाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल.
याबाबत चव्हाण म्हणाले, हा प्रकल्प १२ हजार कोटी रुपयांचा असून, तो बांधा, वापरा व हस्तांतरित (बीओटी) करा या तत्त्वावर राबविला जाणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे शिरूर तसेच तळेगाव चाकण या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. तसेच द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा भारदेखील कमी होणार आहे. हा प्रकल्प १३५ किलोमीटर लांबीचा असून, तो चार पदरी प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सरकारवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.












