न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२५) :- चिंचवडगाव येथील तालेरा रुग्णालयाच्या नव्या इमारतीतील वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सध्या येथे स्त्री रोग, बालरोग विभाग, तातडिक उपचार आणि बाह्यरुग्ण विभाग कार्यरत आहे.
आंतररुग्ण विभागात सध्या ५० खाटांची सोय केलेली आहे. या इमारतीतील तिसऱ्या मजल्यापासून ते पाचव्या मजल्यापर्यंतच्या जागेचे हस्तांतरण महापालिका भूमी जिंदगी विभागाकडून अद्याप रुग्णालय प्रशासनाकडे करण्यात आलेले नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येथे टप्प्याटप्प्याने विविध वैद्यकीय सेवा सुरू केल्या जाणार आहेत.
रुग्णालयातील उर्वरित विविध विभाग पूर्ण क्षमतेने सुरू केले जाणार आहे. हे विभाग सुरू झाल्यानंतर येथे एकूण २५० खाटांचे रुग्णालय सुरू होऊ शकेल. स्त्री रोग विभाग (१२० खाटा), बालरोग विभाग (४५ खाटा), नवजात शिशुचा अतिदक्षता विभाग (एनआयसीयू – १५ खाटा), बालकांचा अतिदक्षता विभाग (पीआयसीयू ५ खाटा), डायलिसिस (७ खाटा) तसेच सामान्य शस्त्रक्रिया, मेडिसीन विभाग पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालय प्रमुख डॉ. संजय सोनकर यांनी दिली.












