- तरीही सल्लागार नियुक्ती केल्याने आश्चर्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२५) :- काळेवाडी फाटा ते चिखली हा बीआरटीएस मार्ग अनेक वर्षांपासून अर्धवट स्थितीत धूळ खात पडून होता. हा रस्ता पूर्ण करण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या उद्योगांच्या इमारती पाडून रस्त्याचे काम करण्यात आले. त्यानंतर आता त्याच कामासाठी महापालिकेकडून सल्लागार नेमण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काळेवाडी फाटा ते चिखलीतील देहु-आळंदी रस्ता असा ११ किलोमीटर अंतराचा बीआरटी मार्ग महापालिकेने विकसित केला आहे. मात्र, ऑटो क्लस्टर आणि आयुक्त बंगल्यासमोरील जागा एमआयडीसीकडून ताब्यात येण्यास विलंब झाल्याने हा मार्ग तब्बल १४ वर्षे पूर्ण होऊ शकला नाही.
या मार्गास अडथळा ठरत असलेल्या उद्योगांना महापालिकेने सन २००७ मध्ये नोटीस दिली होती. त्यासंदर्भात एमआयडीसी विभागाशी पत्रव्यवहार केला. हा बीआरटी मार्ग सन २०१८ मध्ये बांधून तयार झाला. मात्र, येथील जागा ताब्यात येत नसल्याने पीएमपीएमल बस सुमारे १ किलोमीटर वळसा मारून ये-जा करीत आहे. अडथळा ठरणाऱ्या उद्योगांचे एमआयडीसीच्या केएसबी चौकातील डी टू ब्लॉक येथील जागेत स्थलांतरण करण्यात आले आहे. महापालिकेने नुकसान भरपाई म्हणून एमआयडीसीला सात कोटी रूपये दिले. नोव्हेंबर २०२४ मध्ये इमारत पाडून तेथे रस्त्यासाठी सपाटीकरण करण्यात आले आहे. तसेच, स्ट्रॉम वॉटर लाइन टाकण्यात आली आहे. विद्युत दिव्यांचे खांब उभे करण्यात येत आहेत, रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आयुक्त बंगला आणि ऑटो क्लस्टर या दोन्ही बाजूने बीआरटीचा अखंड रस्ता आता स्पष्ट दिसत आहे. त्या कामासाठी सुमारे ३ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.
असे असताना स्थापत्य प्रकल्प विभागाने या कामासाठी आता सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यासाठी १५ जानेवारी २०२५ ला निविदा प्रसिद्ध करण्यात आली. दोन सल्लागारांनी सहभाग घेतला. तांत्रिक गुणांनुसार मॅप्स ग्लोबल सिव्हिलटेक प्रा. लि. या एजन्सीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली आहे. एकूण कामाच्या खर्चाच्या रक्कमेपैकी १.४५ टक्के शुल्क त्या सल्लागार एजन्सीला दिले जाणार आहे.












