न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२५) :- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील शंभरपेक्षा अधिक पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटनांनी मुळा नदीकाठी सुरू असलेल्या नदी सुधार प्रकल्पाला विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांसह इतर राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे नदी स्वच्छतेबाबत साकडे घातल्यानंतरही काहीही हाती न लागल्याने हतबल झालेल्या नागरिकांनी रविवारी (२० एप्रिल) सकाळी मुळा नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले.
पिंपळे निलख स्मशानभूमीजवळ मुळा नदीपात्रात रविवारी आंदोलन करण्यात आले. सुमारे २५ जणांनी नदीपात्रात उतरून ठिय्या आंदोलन केले. शहरातील पवना इंद्रायणी आणि मुळा नद्यांची स्वच्छता करणे आणि नदी सुधार प्रकल्प थांबविण्याच्या आग्रही मागणीसाठी हे आंदोलन मागील काही दिवसांपासून केले जात आहे. या आंदोलनाला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील शंभरपेक्षा अधिक पर्यावरणप्रेमी सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
मुळा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात पशू-पक्षी आणि प्राण्यांचा अधिवास आहे. नदी सुधार प्रकल्पात नदीकाठच्या अनेक झाडांची कत्तल केली जात आहे. यामुळे या पशू-पक्षी आणि प्राण्यांचा अधिवास संपुष्टात येणार आहे. त्यामुळे सातत्याने आंदोलने केली जात आहेत. पुढील आठवडाभरात हा प्रकल्प थांबवला नाही, तर २७ एप्रिल (रविवारी) पुन्हा पिंपळे निलख येथे तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा पुणेकर व पिंपरी चिंचवडकरांनी दिला आहे.











