न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मध्ये सहभाग घेतला आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये क्रमांक पटकाविण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहर स्वच्छतेवर भर दिला आहे.
नियम मोडून शहर अस्वच्छतेत भर घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. ओला आणि सुका कचरा एकत्र देणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, धुंकणे, उघड्यावर शौच करणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे, व्यावसायिक आस्थापनांमार्फत कचरापेटी न ठेवणे, कचरा जाळणे, बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करणे अशा विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
३०० रुपयांपासून ३५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येतो. २०२४-२५ या आर्थिक वर्षात नियम मोडणाऱ्या आठही प्रभागांतील ७ हजार २१४ आस्थापना, नागरिकांकडून तब्बल १ कोटी ४८ लाख ८५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, २०२२-२३ मध्ये १ कोटी ५ लाख १४ हजार ५२१, २०२३-२४ मध्ये १ हजार ८४४ नागरिकांकडून ३८ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
” स्वच्छ सर्वेक्षणमध्ये शहराची क्रमवारी सुधारण्यासाठी महापालिकेच्या वतीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांची देखील साथ महत्वाची आहे. मात्र, अनेक नागरिक या अभियानाला साथ देत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांवर कटू कारवाई करत दंड आकारला जातो. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात १ कोटी ४८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करत शहर स्वच्छ करण्यासाठी हातभार लावावा.”
– सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग पिंपरी-चिंचवड महापालिका…











