- कापूर ओढ्यावर पुलाचे विस्तारीकरण होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. २३ एप्रिल २०२५) :- देहू नगरपंचायत हद्दीतील देहू ते देहूरोड या पालखी मार्गावरील परंडवाल चौक येथील कापूर ओढ्यावर ४५ मीटर लांबी पुलाचे (वाईडिंग) काम सुरू होणार आहे. परंडवाल चौक येथे नगरपंचायतच्यावतीने त्यासाठी रेखांकन करण्यात आले.
याबाबत देहू नगरपंचायतीचे मुख्य अभियंता संघपाल गायकवाड म्हणाले, “देहू ते देहूरोड या पालखी मार्गावरील परंडवाल चौक येथे ४५ मीटर लांब पूल होणार आहे. रस्त्याच्या मध्यभागापासून साडे बावीस मीटर उजवीकडे आणि साडे बावीस मीटर डावीकडे पूल होणार आहे. तर रुंदी दहा मीटर आहे. या पुलासाठी साडेआठ कोटी रुपये खर्च येणार आहे. कापूर ओढ्यावर नवीन पूल झाल्याने परंडवाल चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. सध्या येथे अरुंद पूल आहे.
परंडवाल चौक ते देहूरोड हा पालखी मार्ग अरुंद असल्याने वाहतूक कोंडी पुढे सुरूच राहणार आहे. त्यामुळे देहूरोडपर्यंत पालखी मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी देहू, माळवाडी, झेंडे मळा, चिंचोली भागांतील ग्रामस्थ करत आहेत. मात्र, झेंडे मळा ते देहूरोड या चार किलोमीटर हद्दीतील रस्त्यावर लष्कराची मालकी असल्याने रस्ता रुंदीकरणास परवानगी मिळत नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षे रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्षांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही चार किलोमीटर पालखी मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे. खा. श्रीरंग बारणे यांनीही नुकतेच लोकसभेत प्रश्न उपस्थित करून रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी केला आहे. त्यामुळे परंडवाल चौकात पूल झाला तरी पुढे वाहतूक कोंडी राहणारच आहे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण कधी होणार ? असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये आहे.










