न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२५) :- वादळी वारे, अवकाळी पावसामुळे जाहिरात होर्डिंग कोसळून दुर्घटना घडू नये, म्हणून १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिने कालावधीत जाहिरात बॅनर लावू नका, असे आदेश देऊनही शहरातील बहुतांशी होर्डिंगवर जाहिराती आहेत. त्यामुळे होर्डिंगधारकांनी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या आदेशाला फाट्यावर मारल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई न करता समज देऊ, अशीच अधिकाऱ्यांची भूमिका आहे.
शहरातील किवळे येथे १७ एप्रिल २०२३ रोजी अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच मजुरांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर महापालिकेने शहरातील १७४ अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त केले. शहरात सद्यःस्थितीत सुमारे एक हजार ४०० होर्डिंग अधिकृत असल्याचा दावा आकाश चिन्ह व परवाना विभागाने केला आहे. किवळे दुर्घटनेनंतर प्रशासनाने होर्डिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली, असे असले तरी होर्डिंगधारकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे.
शहरातील जाहिरात होर्डिंगचालक व धारक आणि आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच महापालिकेत बैठक झाली होती. वारे, पावसामुळे होर्डिंग कोसळून अपघाताची शक्यता असते. पावसाळ्यापूर्वीच्या १५ एप्रिल ते १५ जून असे दोन महिने होर्डिंगवर जाहिरात बॅनर न लावण्याचा सूचना होर्डिंगचालकांना दिल्या होत्या. या कालावधीत होर्डिंग रिकामे ठेवावेत, लोखंडी स्ट्रक्चर, फाउंडेशन तात्काळ दुरुस्ती करून घ्यावे. होर्डिंग फाउंडेशनची तपासणी करून होर्डिंग सुरक्षित करण्यासाठी लॉकची व्यवस्था करावी, अशा सूचना आकाशचिन्ह व परवाना विभागाने दिल्या होत्या.
सर्व सूचनांचे पालन करण्याची ग्वाही होर्डिंगधारकांनी महापालिका प्रशासनाला दिली होती. मात्र, २३ एप्रिल होऊनही शहरातील विविध भागातील होर्डिंगवर जाहिराती बिनबोभाटपणे सुरू आहेत. त्यामुळे होर्डिंगधारकांनी महापालिकेच्या आदेशाला फाट्यावरच मारल्याचे दिसते.
पावसाळ्यापूर्वीच्या वादळी वाऱ्यामुळे होडिंग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय यावर्षी प्रथमच १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत होडिंगवर जाहिरात न लावता ते रिकामे ठेवावेत, होडिंगचे स्ट्रक्चर खराब झाले असल्यास ते तातडीने दुरूस्त करून घ्यावे, असा सूचना होर्डिंगचालक व मालकांना दिल्या होत्या. होर्डिंगचालकांना पुन्हा एकदा सूचना देऊ. त्यानंतर कारवाई करण्यात येईल.
– डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग…











