न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना होर्डिंग, फ्लेक्स, फलक, किऑक्स, गॅण्ट्री लावण्यात येत आहेत. त्यावर खासदार, आमदार व लोकप्रनिधींचे छायाचित्रे आणि नावे असतात. अशा प्रकारे विनापरवाना जाहिरात शहरात लावू नये, असे पत्र महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी खासदार व आमदारांना पाठविले आहे. आयुक्तांच्या आवाहनामुळे शहरात विनापरवाना फ्लेक्स व जाहिराती लावणे बंद होणार का, असे प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या पोलिस इमारतीच्या भूमिपूजनाच्या ६ फेब्रुवारी २०२५ च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, फलक, किऑक्स लावणाऱ्यांवर राजकीय पदाधिकाऱ्यांवर थेट कारवाई करा. त्यांचे छायाचित्र असल्यास प्रथम कारवाई करा, असे आदेश त्यांनी पालिका आयुक्तांना दिले होते. दरम्यान डांगे चौकात खुद्द माजी नगरसेवक आणि विद्यमान आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची फलकबाजी पालिकेच्या कमानीवर केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस माजी नगरसेवक आणि आमदारांवर कारवाईचे आदेश देणार काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
उत्सव, जयंती तसेच, लोकप्रतिनिधींचे वाढदिवस आदी निमित्त शहरभरात सर्वत्र विनापरवाना होर्डिंग, फ्लेक्स, फलक, किऑक्स लावले जात आहेत. महापालिकेच्या गॅण्ट्रीवरही (कमानी) विनापरवाना जाहिराती लावल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी फ्लेक्स व फलकांची गर्दी झाली आहे.
पालिका निवडणुका होण्याच्या अपेक्षेने इच्छुक तसेच, माजी नगरसेवक जाहिरातबाजी करत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शहर सौंदर्यास बाधा पोहचत आहे. विनापरवाना जाहिरातीवर खासदार आणि आमदारांचे छायाचित्र तसेच, नाव वापरण्यात येते. मुंबई उच्च न्यायालयाने विनापरवाना जाहिरात लावण्यास बंदी घातली आहे. अशा अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व महापालिकांना दिले आहेत. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या पोलिस इमारतीच्या भूमिपूजनाच्या ६ फेब्रुवारी २०२५ च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, फलक, किऑक्स लावणाऱ्यांवर राजकीय पदाधिकाऱ्यांवर थेट कारवाई करा. त्यांचे छायाचित्र असल्यास प्रथम कारवाई करा, असे आदेश त्यांनी पालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार पालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, फलक व किऑक्सवर कारवाई केली जात आहे. आत्तापर्यंत एकूण १४ जणांवर पोलिसांत गुन्हे नोंदविले आहेत.
असे असतानाही शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना फ्लेक्स, फलक लावले जात असल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षाची जाहिरात अधिकृत होर्डिंगवरच करावी.
त्याबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज द्यावी. शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करावे. अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, फलक, किऑक्स, गॅण्ट्रीवरील जाहिरातीमुळे होणारे विद्रुपीकरण थांबवून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे पत्र महापालिका आयुक्त तथा प्रशासक सिंह यांनी खासदार श्रीरंग बारणे, खा. डॉ. अमोल कोल्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप, आ. महेश लांडगे, आ. उमा खापरे, आ. अमित गोरखे यांना दिले आहे. या संदर्भातील पत्र सर्व राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षांनाही देण्यात येणार आहे. आयुक्तांच्या या आवाहनास खासदार व आमदार प्रतिसाद देणार का? लोकप्रतिनिधी विनापरवाना अनधिकृतपणे जाहिरात होर्डिंग, फ्लेक्स लावणे बंद करतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात परवाना असलेल्या होर्डिंगवर तसेच, बस थांब्यांवर जाहिरात करण्यास परवानगी आहे. त्याशिवाय इतर ठिकाणी होर्डिंग, फ्लेक्स, किऑक्स, गॅण्ट्री व फलक लावण्यास बंदी आहे. असा नियम असतानाही शहरातील बहुतांश चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी फ्लेक्स लावण्याची स्पर्धा दिसून येत आहे. त्या अनधिकृत फ्लेक्समुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्या अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग, गॅण्ट्री, किऑक्सवर कारवाई करण्यास महापालिका प्रशासानाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसत असल्याने विनापरवाना फ्लेक्स लावण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सर्व राजकीय पक्षांना अनधिकृत जाहिरात न लावण्याबाबत निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशनुसार महापालिकेकडून अनधिकृत जाहिरात होर्डिंग, फ्लेक्स, किऑक्स, गॅण्ट्रीवर कारवाई केली जात आहे. तरीही ते प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येत आहेत. राजकीय पक्षाचे तसेच, लोकप्रतिनिधींचे छायाचित्रे वापरून विनापरवाना होर्डिंग, फ्लेक्स, किऑक्स, गॅण्ट्री लावले जात आहेत. त्यामुळे आयुक्तांनी खासदार व आमदार अनधिकृत जाहिरात न लावण्याबाबत पत्र पाठविले आहे, असे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.











