- पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२५) :- जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाही हल्ल्याच्या पाश्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने सूत्रे हलवली आहेत. जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेल्या नागरिकांची माहिती घेण्यात आली असून जिल्ह्यातील ३५६ पर्यटक काश्मीरमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे २९ पेक्षा जास्त पर्यटकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. पहलगाममध्ये देखील शहरातील काही पर्यटक असल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांकडून पहलगाम स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला जात आहे.
पहलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी (दि. २२) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या २८ जणांपैकी महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. तर पुणे जिल्ह्यातील दोन पर्यटकांचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यामधील अनेक पर्यटक ट्रॅव्हल कंपन्यांच्या मार्फत पर्यटनासाठी गेल्याचे समजले आहे. या पर्यटकांच्या नातेवाईक व ट्रॅव्हल कंपन्यांशी प्रशासनाकडून संपर्क साधला जात आहे. तसेच त्यांना सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे प्रशसानाकडून सांगण्यात येत आहे.
शहरातील काही पर्यटक लग्नानंतर तर अनेक जण कुटुंबासह सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जम्मू काश्मीरला गेले आहेत. पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात हायअर्लट जाहीर करण्यात आला आहे. या घटनेमुळे पर्यटकांच्या नातेवाइकांमध्ये मात्र, काळजी वाढली आहे.
शहरातील काही नागरिक पहलगाम परिसरात अडकल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे स्थानिक अतिरिक्त पोलीस महासंचालक मनीष सिन्हा यांच्याशी संपर्क साधला आहे. नागरिकांना सर्वतोपरी मदत मिळवून दिली जात आहे. तसेच शहरात असणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांशी संपर्कात असून, इकडेही त्यांना मदत दिली जात आहे.
– विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड…











