- मेट्रो मार्गीकेत पुणे शहर आघाडीवर, पिंपरी-चिंचवडला ठेंगा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने वाढ होत असून, मेट्रो सिटीकडे वाटचाल सुरू आहे. असे असताना शहरात मेट्रोच्या नवीन एकाही मार्गाचा समावेश झालेला नाही. तर, पुणे शहरात नवीन मार्गाचा पाऊस पडत आहे. त्यावरून पिंपरी-चिंचवड शहराकडे मेट्रोसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील केवळ पिंपरी ते दापोडी असा केवळ ७.५ किलोमीटर अंतर मेट्रोचा मार्गाचा समावेश झाला. त्या मार्गावर मेट्रो धावत आहे. या मार्गामुळे पिंपरी-चिंचवड शहर पुण्याशी जोडले गेले आहे. या एकूण प्रकल्पात पिंपरी स्टेशनवरून सर्वाधिक उत्पत्र मिळत आहे. लोकांच्या आग्रहामुळे पिंपरीपासून निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यतच्या ४.५ किलोमीटर अंतराचा मेट्रोचा विस्तारीत मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्षात तो मार्ग सुरू होण्यास दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागू शकतो.
इंद्रायणीनगर ते चाकण मेट्रो, अंतर्गत रिंगरोडही कागदावरच..
महापालिकेच्या वतीने इंद्रायणीनगर ने चाकण अशी १६.११ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. त्यात ११ मेट्रो स्टेशन असून, त्यासाठी १ हजार ५४८ कोटी १४ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्या डीपीआरचे अनेकदा पालकमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. मात्र, त्या प्रकल्पास अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही, तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील अंतर्गत ३१.४० किलोमीटर अंतराच्या एचसीएमटीआर (रिंग रोड) मार्गचे अनेकदा सादरीकरण करण्यात आले. मात्र, तोही मार्ग अद्याप कागदावरच आहे.
पुणे शहरात मेट्रोसाठी अनेक नव्या मार्गाची घोषणा होत आहे. स्वारगेट ते कात्रज या ५.४ किलोमीटर अंतराच्या विस्तारीत मार्गाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. स्वारगेट ते खडकवासला, हडपसर ते खराडी, एसएनडीटी ते वारजे, रामवाडी ते वाघोली, वनाज ते चांदणी चौक, शिवाजीनगर ते हडपसर हे एकूण ६२ किलोमीटर अंतराचे ६ नवे मेट्रो मार्ग होणार आहेत. त्या मार्गाच्या डीपीआरलाही पुणे महापालिकेने मंजुरी दिली आहे. तसेच, हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशन या मार्गानाही पुणे महापालिकेने मान्यता दिली आहे. ही सुमारे ९० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराची मार्गिका आहे. पुणे शहरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. मात्र, पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहर मागे पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी उदासीन ?
पिंपरी-चिंचवड शहरात मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे दोन खासदार आहेत. शिवसेनेचे श्रीरंग बारणे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे खासदार आहेत. तर, भाजपचे महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे असे पाच आमदार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या नव्या मार्गाची गरज आहे. त्याबाबत सामाजिक संघटनांकडून मागणीही केली जात आहे. त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी कमी पडत असल्याचे स्पष्ट होत आहे.
इंद्रायणीनगर ते चाकण मेट्रो, अंतर्गत रिंगरोडही कागदावरच…
महापालिकेच्या वतीने इंद्रायणीनगर ते चाकण अशी १६.११ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. त्यात ११ मेट्रो स्टेशन असून, त्यासाठी १ हजार ५४८ कोटी १४ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्या डीपीआरचे अनेकदा पालकमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. मात्र, त्या प्रकल्पास अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही, तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील अंतर्गत ३१.४० किलोमीटर अंतराच्या एचसीएमटीआर (रिंग रोड) मार्गचे अनेकदा सादरीकरण करण्यात आले. मात्र, तोही मार्ग अद्याप कागदावरच आहे.
दुसरीकडे, पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ किलोमीटर अंतराच्या मार्गात पिंपरी-चिंचवड शहराला वगळण्यात आले आहे. त्या मार्गावरील एकूण २३ स्टेशनपैकी एकही स्टेशन पिंपरी-चिंचवड शहरात नाही.
महापालिका अर्थसंकल्पात मेट्रोला ठेंगा…
पिंपरी ते निगडी या ४.५ किलोमीटर अंतराचा विस्तारीत मार्गाचे काम सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एकही नवीन मेट्रो मार्ग होणार नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात मेट्रो प्रकल्पासाठी काहीच तरतूद करण्यात आलेली नाही. महापालिका प्रशासनाने मेट्रोला ठेंगा दाखविल्याचे स्पष्ट होत आहे.
नवीन मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू…
पिंपरी-चिंचवड महापालिकेने सांगितल्यानुसार महामेट्रोकडून निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापासून चाकणपर्यंत मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. निगडीपासून तो मार्ग रावेतमधील मुकाई चौक, एक्सप्रेस वेचा बायपास मार्गे वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, भोसरी, चाकण असा आहे. त्या डीपीआरला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर राज्य व केंद्राची मान्यता लागणार आहे, असे महामेट्रीचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
निगडी ते नाशिक फाटा मेट्रोचा प्रस्तावित मार्ग…
पिंपरी-चिंचवड शहरात निगडीवरून रावेत, वाकड मार्गे नाशिक फाटा या मार्गावर नवीन मेट्रो मार्ग तयार करण्याबाबत नियोजन सुरू आहे. त्याबाबत आराखडा तयार केला जात आहे. तसेच, शहारातील एचसीएमटीआर मार्गाचा आराखडा तयार आहे. लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.











