न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२५) :- राज्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता आली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भोसरी विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणारे भोसरी मतदारसंघातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यांच्यात सकारात्मक चर्चाही झाली होती. त्यामुळे पक्षात जोरदार इनकमिंग वाढेल अशी शक्यता निर्माण झाली होती.
परंतु, महापालिका निवडणूका पुन्हा रखडल्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची घरवापसीची चर्चा पुन्हा चर्चाच ठरली आहे. इच्छुक पुन्हा वेटींगवर गेले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याचा मार्ग स्वीकारला होता. भोसरी विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राजीनामा देऊन शरदचंद्र पवार गट जवळ केला होता. त्यावेळी त्यांच्याबरोबर २८ जणांनी प्रवेश केला होता. त्यानंतर शरद पवार गटाकडून गव्हाणे यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र, ते पराभूत झाले.
शहराचा विकास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे झाला. त्यांच्यामुळे ‘बेस्ट सिटी’ सन्मान मिळाला. पालिकेतही राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे. ते कार्यकर्त्यांना ताकद देतात. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत अजित गव्हाणे यांच्यासह सर्वांनी यावे, यासाठी मी विनंती करणार आहे, असे म्हणणारे माजी आमदार विलास लांडे हे ही सध्या शांत आहेत.
अनेक नगरसेवक पुन्हा येण्यास तयार आहेत. कोणत्याही अटी- शर्तीविना प्रवेश करण्यास हरकत नाही, याबाबत पवार यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.
– योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी, अजित पवार गट…











