- अशी होऊ शकते आपली फसवणुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२५) :- आंतरराष्ट्रीय कंपनीतील वरीष्ठ अधिकारी यांच्या नावाचे बनावट Email / Whatsapp /Skype वरुन प्राप्त संदेशाद्वारे परदेशात पैसे पाठविण्याबाबत होत असलेल्या फसवणुकीबाबत
पिंपरी चिंचवड पोलीस सायबर पोलीस ठाण्याकडुन जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना, खाजगी कंपनीतील कर्मचारी, स्थानिक कंपनीचे अधिकारी यांना आंतरराष्ट्रीय कंपनीतील वरीष्ठ अधिकाऱ्यांचे नावाने बनावट Email/Whatsapp/Skype व्दारे संदेश प्राप्त होतात. नमुद संदेशामध्ये स्थानिक कंपनीचे अधिकारी/संचालक/मॅनेजर यांना कंपनीस परदेशात गुंतवणुक करावयाची असल्याचे सांगितले जाते.
स्थानिक कंपनीचे अधिकारी यांना आंतरराष्ट्रीय व्यवहाराची रक्कम परदेशात वेगवेगळया बँकांमध्ये पाठविणेबाबत सांगितले जाते. नमुद गुंतवणुकीसाठी/व्यवहारासाठी स्थानिक कंपनीचे अधिकारी यांना प्राधिकृत केले असल्याचे बनावट कागदपत्र Email/Whatsapp/Skype पाठविले जातात.
नमुद व्यवहार गोपनीय असून याबाबत इतरांशी चर्चा न करण्याची अट घातली जाते. अशा प्रकारे कंपनीचे अधिकारी यांना परदेशात वेगवेगळया बँकांमध्ये रक्कम पाठविण्यास भाग पाडले जावून फसवणुक केली जाते
अशा प्रकारची फसवणुक टाळण्यासाठी कंपनीच्या वरीष्ठ अधिकारी यांचे नावे Email/Whatsapp/Skype वर_आलेल्या संदेशाची खात्री करावी. सायबर गुन्हेगारांकडून कंपनी अधिकारी / कर्मचारी यांच्या नावाशी मिळती जुळती ईमेल आयडी तयार करून संपर्क साधला जातो. सदर बनावट ईमेलचे डोमेन चेक करून खात्री करावी. संबधीत कंपनीचे डोमेन मधून ईमेल प्राप्त झाल्याची खात्री करावी. नमुद बनावट Email/Whatsapp/Skype मध्ये दिलेला मोबाईल नंबर, ईमेल कंपनी अधिकारी यांचा आहे का? याची खात्री करून आर्थिक व्यवहार करावेत.
परदेशात पैसे पाठविताना / व्यवहार करताना कंपनीचे मुख्यालय, लिगल टिम, तसेच नेहमीच्या संपर्कात असलेले वरिष्ठ अधिकारी यांचे सोबत संपर्क करावा. अशा प्रकारे फसवणुकीच्या प्रकारापासून सावध रहा. असा प्रकार आपले सोबत घडला असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाणेस संपर्क साधुन तक्रार करावी. फसवणुक बाबत www.cybercrime.gov.in अथवा 1930 हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.


















