न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२५) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या दापोडी येथील पोलिस ठाण्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी फीत कापून करण्यात आले. यावेळी सात कलमी शंभर दिवसांतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांचे पवार यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलिस आयुक्त सचिन हिरे, दापोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश वाघमारे उपस्थित होते.
सात कलमी शंभर दिवसांतर्गत राबविलेल्या उपक्रमाची माहिती पवार यांना यावेळी देण्यात आली. इमारतीचे तसेच पोलिस आयुक्तालयाच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.
दापोडी पोलिस ठाण्यासाठी देण्यात आलेली नवीन इमारत ही प्रशस्त असून अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज आहे. महापालिकेच्या लाइट हाऊस प्रकल्पाची ही इमारत असून त्यातील काही भाग पोलिस ठाण्यासाठी दिला आहे. इतर सर्व सोयी-सुविधांसह या ठिकाणी मोकळे मैदान व गार्डन परिसर आहे. प्रशस्त डेबुक, मुद्देमाल कारकून, तपास पथक, पुरुष विश्रांती कक्ष, महिला विश्रांती कक्ष, बालस्नेही कक्ष आणि हिरकणी कक्ष उभारला आहे. पार्किंगसाठीही प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली आहे.











