न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२५) :- उन्हाच्या झळा तीव्र होत असून, पाण्याची मागणीही सातत्याने वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याच्या पुनर्वापर ही काळाची गरज झाली असताना पिंपरी-चिंचवड शहरातील हाऊसिंग सोसायट्या पाणी पुनर्वापराकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील ४५६ बड्या सोसायट्यांपैकी २६४ सोसायटीत एसटीपी सुरू आहेत, तर एसटीपी सुरू करण्याचे वारंवार आवाहन करूनही १८४ सोसायट्यांमधील एसटीपी बंदच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एसटीपी सुरू नाही केले तर सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने २ डिसेंबर २०२० च्या नवीन एकत्रित बांधकाम व विकास नियमावलीनुसार (युडीसीपीआर) राज्यातील २० हजार चौरस मीटर, त्यावरील मोठ्या क्षेत्रफळाच्या बांधकामांना, १०० सदनिका असलेल्या दीड हजार चौरस मीटर बांधकाम असलेल्या किंवा दररोज २० हजार लिटर पाण्याचा वापर करणाऱ्या हाऊसिंग सोसायटी, शैक्षणिक संस्था, औद्योगिक, व्यापारी, सरकारी व निमसरकारी संस्था, हॉटेल्स, ग्रे वॉटर ट्रिटमेंटनुसार पाण्याचा पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करणे बंधनकारक आहे. एसटीपी न उभारणाऱ्या सोसायट्या आणि आस्थापनांवर कारवाईचे अधिकार महापालिकेस दिले आहेत. पिंपरी चिंचवड शहर चारही बाजूने विस्तारत असून, लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. पाण्याची मागणीही वाढू लागली आहे. शहरवासीयांना ६४० एमएलडी पाणी एकदिवसाआड दिले जात आहे.
शहरवासीयांना ६४० एमएलडी पाणी एकदिवसाआड दिले जात आहे. बांधकाम असलेल्या गृहप्रकल्पात एसटीपी उभारणे बंधनकारक आहे. सोसायटीने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते प्रकिया केलेले पाणी उद्यानातील झाडे व रोपे, सोसायटीच्या आवारातील स्वच्छता, वाहने धुणे, आदी कारणांसाठी वापरावे.
एसटीपी सुरू करण्याबाबत मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना वारंवार पत्रे दिली आहेत. तसेच, पहिली, दुसरी आणि तिसरी अशा पद्धतीने नोटिसाही बजावल्या आहेत. एसटीपी बंद असलेल्या सोसायट्यांना नोटिसा दिल्या आहेत. त्यानंतरही एसटीपी सुरू न केल्याने महापालिकेस पाणीपुरवठा खंडित करण्यासारखे कठोर पाऊल उचलावे लागेल.
संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, महापालिका…











