न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. २९ एप्रिल २०२५) :- संत तुकाराम महाराजांचा ३४० वा पालखी सोहळा १८ जून रोजी श्री श्रेत्र देहूगाव येथून दुपारी प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती संस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ६ जुलैला पंढरपूर मध्ये दाखल होईल. येथे पालखी सोहळा १० जुलैअखेर मुक्कामी असेल, हा पालखी सोहळ्यात तिथीचा क्षय झाल्याने अंथुर्णे येथील मुक्काम रद्द केला आहे. यंदा पालखी लोणी काळभोरपासून पुढे गेल्यानंतर दुपारच्या १ तासाच्या विश्रांतीसाठी शिंदवणे चौकात थांबणार आहे. हा पालखी सोहळा ३४ दिवसांचा प्रवास करणार असून, ३५ व्या दिवशी २१ जुलैला देहूत दाखल होणार आहे.
दरम्यान पत्रकार परिषदेस पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे आदी उपस्थित होते.
पालखी सोहळ्याचा कार्यक्रम…
पालखीचे प्रस्थान बुधवार दि. १८ जून रोजी होणार असून, पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होईल. गुरुवार दि. १९ जून रोजी पालखी इनामदार वाड्यातून बाहेर पडल्यानंतर पहिल्या अभंग आरतीसाठी अनगडशहा बाबा दर्गाजवळ थांबेल तर दुसऱ्या अभंग आरतीसाठी पालखी चिंचोली येथील
पादुका मंदिरात थांबेल आणि संध्याकाळी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात दुसऱ्या मुक्कामासाठी थांबेल.
शुक्रवारी पालखी पुण्यात नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल, शनिवारी पालखी याच मंदिरात मुक्कामी असेल. रविवारी पालखी पुण्यातून लोणी काळभोर कदमताकवस्ती पालखीतळाकडे रवाना होईल, सोमवारी यवत येथील भैरवनाथ मंदिर पालखी तळावर मुक्कामी असेल. मंगळवारी रोजी वरवंड येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. २५ जूनला पालखी उंडवडी गवळ्याची येथे मुक्कामी असेल. २६ जूनला पालखी बारामती शारदा विद्यालयाच्या प्रांगणात मुक्कामी असेल. २७ जूनला सणसर येथे मुक्कामी असेल. २८ जूनला पालखी सणसर मधून पहाटे निघेल व वाटेत बेलवडी येथे पहिले (गोल रिंगण) करेल व पालखी रात्री निमगाव ३, ४ जुलैला पालखीचे सायंकाळी बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण पार पाडेल व पालखी वाखरी येथील पालखी तळावर मुक्कामी राहील.
२९ जूनला पालखीचे इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण होईल व रात्री पालखी इंदापूर येथे मुक्कामी असेल, ३० जूनला पालखी सराटी येथे मुक्कामी असेल. १ जुलै रोजी सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी येथे निरा स्नान घालून पुढे पालखी अकलुजकडे मार्गस्थ होईल. व येथे दुपारी तिसरे गोल रिंगण पूर्ण करेल. पालखी अकलुजच्या माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मुक्कामासाठी रवाना होईल. २ जुलैला पालखी अकलुजवरून सकाळी निघेल व दुपारी पालखी मार्गावरील माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल. त्यानंतर पालखी रात्री बोरगाव येथील पालखी तळावर मुक्कामी राहील. ३ जुलैला पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामासाठी रवाना होईल.











