- महापालिकेच्या आवारात संघटनांचे आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली कुदळवाडीतील अनधिकृत मंदिर, मज्जित अशा ३१ धार्मिक स्थळांना नोटीसा दिल्या आहेत. त्या रद्द कराव्यात तसेच वातावरण बिघडू नये याकरिता कारवाई करू नये या मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गेट समोर गेली पाच दिवस धरणे आंदोलन सुरु आहे.
मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जन आक्रोश असतानाही महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष असल्याने शहरातील विविध संघटना राजकीय पक्ष यांचा आंदोलनास मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला.
प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीचे अध्यक्ष अजिज शेख, बाळासाहेब भागवत, अल्पसंख्याक अध्यक्ष खाजाभाई शेख, माजी नगरसेवक मारुती भापकर, राहुल डंबळे, अल्ताफ शेख, रिजवान खान यांच्यासह विविध विविध संघटना संस्था राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामील झाले होते.
काही दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली कुदळवाडी भागातील भंगार गोदाम व दुकानांवर कारवाई केली होती. या कारवाईत गोदामावर बुलडोझर फिरवून हा परिसर मोकळा केला होता. या कारवाईत धार्मिक स्थळांना वगळण्यात आले होते. प्रशासनाने या भागातील बांधकाम विभागामार्फत नोटीसा दिल्या आहेत.











