न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मे २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन २०४१ ची लोकसंख्या लक्षात घेऊन शहराचा नवीन विकास आराखडा (डीपी प्लॅन) तयार करण्यात आला आहे. तो बुधवारी (दि. १४) प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. त्या दृष्टीने नगर रचना विभागाने तयारी केली आहे.
महापालिकेच्या सन १९९७ मध्ये विकास आराखडा तयार करण्यात आला होता. त्याची मुदत १७ मे २०२५ ला संपत आहे. महापालिकेने सन २०४१ मधील पिंपरी-चिंचवड शहराची लोकवस्ती आणि लोकसख्या लक्षात घेऊन नवीन डीपी प्लॅन तयार केला आहे. अहमदाबादच्या खासगी एजन्सीने डीपी प्लॅन बनवला आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडून नवीन आराखड्यास सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यात येणार आहे. त्यानंतर येत्या बुधवारी आराखडा जाहीर करण्यात येईल. त्यावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या जाणार आहेत. त्यासाठी मुदत देण्यात येईल. हरकती व सुचनांवर सुनावणी घेऊन अंतिम आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात येईल, असे महापालिकेच्या नगर रचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी सांगितले.


















