न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२५) :- कंपनीवर कारवाई न करण्यासाठी एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी पालिका भवनासमोर करण्यात आली.
स्वप्निल मनोहर पाटील (वय ४०) असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार यांची श्री ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीमधून वायू गळती होऊन वास येत असल्याची तक्रार पालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडे आली होती. या तक्रारीवरून स्वप्निल पाटील यांनी २४ एप्रिल रोजी कंपनीमध्ये पाहणी केली. पुढील कारवाई न करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे एक लाखांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती.
एसीबीने तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली. १४ मे रोजी कनिष्ठ अभियंता स्वप्निल पाटील यांनी पालिकेच्या मुख्यालयासमोरील रस्त्यावर तक्रारदार यांच्याकडून एक लाखाची लाच स्वीकारली. या वेळी त्यांना अटक करण्यात आली आहे.

















