न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मागील काही वर्षांत बदल्या झाल्या नाहीत. त्यात धोरणानुसार बदलीस पात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती तयार करूनही बदल्यांचे आदेश होत नव्हते. अखेर आयुक्त शेखर सिंह यांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत. महापालिकेतील एकूण ४९८ अधिकारी, कर्मचाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे.
महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाने २०१५ मध्ये बदली धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्यात बदल्या करणे अपेक्षित आहे. अ आणि ब संवर्गातील तीन वर्षे झालेले, तर क संवर्गातील कर्मचारी सहा वर्षांनंतर बदलले पाहिजेत. मात्र, मागील काही वर्षात बदली धोरण डावलण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. बदल्याच न झाल्यामुळे काही अधिकारी-कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून होते. मागील वर्षभरापासून बदल्यांसाठी पात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली. त्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव आयुक्तांच्या टेबलावर होते. परंतु, बदल्याचे आदेश काढले जात नव्हते. अखेर आयुक्त सिंह यांना मुहूर्त मिळाला असून त्यांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत.
गट अ ते गट ड वर्गातील एकूण ४९८ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. स्थापत्य कार्यकारी अभियंता ६, उपअभियंता १०, कनिष्ठ अभियंता ४६, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ६, प्रशासन अधिकारी २, विद्युत संवर्गातील कार्यकारी अभियंता १, उपअभियंता ७, कनिष्ठ अभियंता ८, कार्यालयीन अधिक्षक ५, सर्व्हेअर ५, आरेखक २, अनुरेखक ६, वीज पर्यवेक्षक ४. कॉप्युटर ऑपरेटर १८, मुख्य लिपिक ९३, लिपिक १४०, सहायक भांडारपाल ९, सफाई संवर्ग १४, लिफ्टमन २, मेन्टनस हेल्पर १, मजूर ६१, मुकादम २, शिपाई ५० अशा एकूण ४९८ अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
–