- मोक्याच्या ठिकाणी टेहळणी मनोरे उभे करण्यात येणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २३ मे २०२५) :- देहूगाव जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १८ जून रोजी दुपारी श्री क्षेत्र देहूगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायत व श्री संत तुकाराम महाराज संस्थान यांची पालखी प्रस्थान सोहळ्याच्या तयारीबाबत संयुक्त आढावा बैठक गुरुवारी पार पडली.
संस्थानच्या सूचनांनुसार तयारीवर चर्चा झाली. भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करडी नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मोक्याच्या ठिकाणी टेहळणी मनोरे उभे करण्यात येणार आहेत.
नगरपंचायतीच्या अध्यक्षा पूजा दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली, प्रभारी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, कार्यालयीन अधीक्षक प्रियांका कदम, उपनगराध्यक्ष मयूर शिवशरण, नगरसेवक योगेश परंडवाल, प्रवीण काळोखे, नगरसेविका पूनम काळोखे, स्मिता चव्हाण, सपना मोरे, देहू देवस्थान संस्थाचे विश्वस्त दिलीप महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे उपस्थित होते.
दरम्यान, पालखी सोहळ्याचे १८ जून रोजी दुपारी श्री क्षेत्र देहुगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आणार आहे. त्यासाठी विविध कामांचे वाटप करण्यात आले आहे. सोहळ्यासाठी ठिकाणांची निश्चिती करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज संस्थान च्यावतीने विविध सूचना करण्यात आल्या आहेत. नगरपंचायतीच्या विविध विभागांना त्याबाबत अवगत करण्यात आले आहे. त्याचा आढावा घेतला जात आहे. युद्धपातळीवर तयारी करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
यात्रा काळात पाण्याचे टैंकर नळतोट्यांसह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इंद्रायणी नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. देहूतील सर्व आरओ फिल्टर प्लैंटधारकांनी पाणी तपासणी करून घेण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. स्वच्छ व शुध्द पाणीपुरवठयासाठी प्राथमिक केंद्रासही पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
नदी घाटावरील सर्व हायमास्ट दुरुस्त करून चालू करणे, मंदिर परिसर, वैकुंठ मंदिर व परिसर मुख्य कमान, शहरातील सर्व रस्ते व विविध दिंड्यांच्या ठिकाणी विद्युतपुरवठा व्यवस्थित होईल याची दक्षता घेणे, उघड्यावरील डीपी व तारासंबंधी सुरक्षितता व अखंड विद्युतपुरवठा ठेवण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
साफसफाई करणे व पाच कर्मचारी पाच दिवसाकरिता उपलब्ध करून देणे, इंद्रायणी नदीमधील जलपर्णी काढणे हे काम प्रगतिपथावर आहे. दोन दिवसांसाठी जीवरक्षक ठेवणे, अग्निशमन बंब देण्याबाबत मागणीपत्र देणे, वैकुंठगमन मंदिर परिसराची साफसफाई अशी कामे सोपवण्यात आली आहेत. अनगडशहा बाबा दर्गा ते देहूगाव मुख्य कमान देहूगाव चौदा टाळकरी कमान ते भक्ती शक्ती निवास यादरम्यान असलेल्या सर्व अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावून अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.











