- आरोपींच्या कोठडीत वाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२५) :- वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणातील अटक आरोपींना पोलिसांनी आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले. त्यावेळी, आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयासमोर करण्यात आली आहे. तर, आरोपींच्या वकिलाकडून युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
यावेळी, न्यायाधीशांनी आरोपींना पोलीस कोठडी दरम्यान पोलीसांकडून काही त्रास झाला का, हे विचारले असता पाचही आरोपींनी नाही असे उत्तर दिले. तर, आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. याप्रकरणी, आरोपी वैष्णवीचा नवरा शशांक, आई लता आणि नणंद करिश्माला एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवण्यात आल असून सासरे राजेंद्र आणि सुशील यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.
फिर्यादीच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. याप्रकरणातील फरार निलेश चव्हाण कुठे आहे, याची चौकशी करायची आहे. मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग असू शकते. तसेच, आरोपींनी हुंड्यात मिळालेले 51 तोळे सोने गहाण ठेवले आहे,त्याची माहिती घ्यायची आहे. तर, आरोपींनी वैष्णवीला मारहाण केलेली हत्यारे आणि रॉड हस्तगत करायची आहेत. त्यामुळे, आरोपींना पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी वैष्णवीच्या वडिलांच्या वकिलांनी केली होत. त्यानुसार, न्यायालयाने पोलीस कोठडीत वाढ केली आहे.
हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांकडून आरोपींना पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद करताना वैश्नवीचे न्यायालयात चारित्र्य हणण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. फिर्यादीच्या वकिलांकडून लावण्यात आलेल्या आरोपावर हगवणेंच्या वकिलांनी न्यायालयात भाष्य केलं. वैष्णवीची टेंडंसीच सुसाईड करण्याची होती, तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट उघडे पडले होते. त्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकदा रॅट पॉइझन खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून तिने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता, अशा धक्कादायक दावा राजेंद्र हगवणेच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. तसेच, आरोपी निलेश चव्हाणला अडकवण्यात येत असल्याचंही वकिलांनी म्हटलं आहे.
मुलीच्या गळ्यातील गहाण ठेवलेले सोने कुठल्या बँकेत आहे, हे हगवणेंनी आधीच सांगीतले आहे. तर, ज्याच्याकडे वैष्णवीचे बाळ होते, त्या निलेश चव्हाणला या प्रकरणात आरोपी करणे चुकीचे आहे. कारण, निलेश चव्हाणने बाळाचा सांभाळ केला आहे. पण, त्यानेच हेळसांड केली म्हणून त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही, तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या. पण त्याला या प्रकरणात आरोपी करणेच चुकीचे आहे, असा युक्तिवाद हगवणेच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. तसेच, आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत, आम्ही 40 लाखांच्या फॉर्च्यूनरसाठी कशाला हॅरेसमेंट करू, असा युक्तिवाद करत वकिलाने पोलीस कोठडीऐवजी न्यायायलयीन कोठडी देण्याची मागणी केली.