न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २९ मे २०२५) :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी, ज्यांच्या घरात पावसाचं पाणी शिरलंय त्यांना 10 हजार रुपये देणार असल्याची घोषणाच अजित पवारांनी केली.
अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा बारामती मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी, तालुक्यातील सिद्धेश्वर निंबुडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. त्यामध्ये रस्ता, ब्रीज, कोसळलेली घरं आणि वीज खांब, वाहून गेलेले रस्ते इत्यादींचा समावेश आहे. यादरम्यान शेतकरी बांधवांशी, गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची मनस्थिती जाणून घेतली, त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असं आश्वासन देखील अजित पवारांनी नागरिकांना दिलं आहे.
गावातील नुकसानीचे पंचनामे उरकले का, धान्य द्यायला सुरुवात केली आहे. आता, ज्यांच्या ज्यांच्या घरात पावसाने पाणी गेलंय, त्यांना 10-10 हजार रुपये देतोय. लवकरच त्यांना पैसे सोडायला लावतो, असे म्हणत अजित पवारांनी पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, यासंदर्भात नेमके निकष काय लावले जाणार आहेत किंवा नेमकं कुणाला ही मदत मिळणार आहे यासंदर्भात अद्याप पूर्णपणे माहिती समोर आली असून प्रशासनाकडून नुकसानग्रस्त लाभार्थींची यादी होण्याची शक्यता आहे.