न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ३० मे २०२५) :- नव्याने सुरू झालेल्या बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले आहेत. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालय व मान्यताप्राप्त संस्थांना वेळोवेळी प्रथम वर्षाच्या परीक्षाबाबत सूचित करण्यात आले होते. त्यात बीबीए, बीबीए (आयबी) बीसीए (सीए), बीसीए (सायन्स), बीसीए (कॉमर्स) या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार प्रात्यक्षिक परीक्षा २ ते ७ जून आणि लेखी परीक्षा ९ ते २१ जून या कालावधीत घ्याव्यात, असेही परीक्षा विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात बीए, बी कॉम आणि बीएस्सी या पारपंरिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची परीक्षा महाविद्यालयस्तरावर होतात. तसेच, निकालही महाविद्यालयाकडून होतात. त्याच धर्तीवर बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमांची प्रथम वर्षाची परीक्षा घेण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला आहे. गतवर्षीपासून या अभ्यासक्रमाला व्यावसायिक दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांला विद्यार्थ्यांची पसंती वाढली आहे.














