- हवामान तज्ज्ञांच्या मते हा आजवरचा आगळावेगळा विक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२५) :- महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतातील शहरांसह अन्य काही राज्यांत यावर्षी मे महिन्यात वळवाच्या पावसाने जबरदस्त तडाखा दिला. गेल्या शंभर वर्षांत वळीव पावसाचा असा दणका प्रथमच अनुभवाला आला आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन ही अस्मानी आपत्ती ओढवली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
यंदाचा मे महिना वळीव पावसाच्या दृष्टीने शतकातील वेगळा असल्याचे आणि शंभर वर्षांत वळवाचा असा पाऊस झाला नसल्याचे मत ‘आयएमडी’ पुण्याचे निवृत्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केले वळवाने उन्हाळी पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे आणि खरीप हंगाम कसा करायचा? हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न उभा आहे. वळवाने केलेल्या वाताहतीत तातडीने दिलासा मिळावा, यासाठी सरकारकडे बळीराजाचेही डोळे लागले आहेत.
एका बाजूला वळीव पाऊस कोसळत असतानाच तो थांबतो न थांबतो तोच मान्सून पावसाचे आगमन झाले आहे. यावर्षी सर्वच ठिकाणी मान्सून १० ते १७ दिवस आधीच दाखल झाला आहे. एवढ्या लवकर मान्सून दाखल होणे हे प्रथमच असे झाले असून, वळवापाठोपाठ मान्सून दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऐन वैशाखात पावसाळी वातावरणाचा अनुभव येण्याचा प्रसंगही पहिलाच म्हटला पाहिजे, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टयाने हा सृष्टी चमत्कार घडला असला, तरी ऋतुचक्रात काही फेरफार झाला असावा का, अशी शंका घेण्याइतपत हा बदल दिसून आला आहे.
अंदमान-निकोबारमध्ये मान्सून १० दिवस आधीच दाखल झाला, तर २४ मे रोजीच केरळात त्याचे आगमन झाले.
केरळात मान्सून येतो न येतो तोच गोवा आणि तळकोकण येथे मान्सूनने धडक मारली. म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून १० ते १५ दिवस आधीच महाराष्ट्रात पोहोचला आहे.
संपूर्ण देशात मे महिन्यात २२० टक्के अधिक वळीव कोसळला, तर महाराष्ट्रात तो ४३७ टक्के अतिरिक्त झाला. महाराष्ट्रातील मे महिन्याची सरासरी २०.७ मि.मी. असते. यावेळी १११ मि.मी. पाऊस झाला. कोकणसह मुंबई ४०९ टक्के, मध्य महाराष्ट्रात ३६९ टक्के, मराठवाड्यात २९० टक्के आणि विदर्भात ३८७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते हा आजवरचा आगळावेगळा विक्रम आहे.











