न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२५) :- उद्योगनगरीचा प्रारूप विकास आराखडा जाहीर होण्यापूर्वी चिखलीतील निळ्या रेषेतील ३२ बंगल्यावर महापालिकेने बुलहोद्वार फिरविला तर दुसरीकडे पिंपळे सौदागर, रहाटणीत निळी रेषाच वळवली असल्याचे उघड झाले आहे. यातून राजकीय नेते, अधिकारी, प्रशासन आणि बांधकाम व्यावसाविकांची अर्थपूर्ण अळीमिळी दिसून येत आहे. याबाबत पर्यावरणवादी संघटना यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी, मुळा या तीन नद्या वाहतात. त्या नद्यांसाठी जलसंपदा विभागाने नद्यांच्या पूररेषेचे काटछेद नकाशे तयार केले होते. त्यानुसार २५ वर्षात येणारा पूर दर्शविणारी निळी पूररेषा आणि १०० वर्षात येणारा पूर दर्शविणारी लाल पूररेषेची आखणी केली आहे.
निळ्या पूररेषेच्या आत बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. सुधारित विकास आराखड्यात पूररेषांची आखणी जलसंपदा विभागाने तयार केलेल्या काटछेद नकाशानुसारच केला असल्याचा दावा आहे. मात्र, त्यात बदल झाला आहे, असे उघड झाले आहे. रहाटणीत सरळ असणारी निळी रेषा सव्हें सर्वे क्रमांक १०२ मधून ते २७ कडे सरळ गेली आहे. ही रेष सर्वे नंबर १०२ पासून १०१ मधून वळवून स. नंबर ९५, २७ आणि २९ मधून वळवली आहे. या रेषा नक्की कोणासाठी बदलल्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान नद्यामध्ये मोठ्या प्रमाणत भराव टाकण्यात येत आहे. त्याबाबत पर्यावरण संघटनेकडून महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याकडे महापालिका प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे, अशी तक्रार पर्यावरणवादी संघटनेमधून होत आहे.
पवना नदी किवळेपासून दापोडीपर्यंत आहे. जलसंपदा विभागाच्या नकाशानुसार पिंपळे सौदागर येथील सर्व्हे क्रमांक १८२ येथे या सर्वेक्षणातील सुमारे ८० टक्के क्षेत्र नदी ते निळी पूररेषा क्षेत्रात येत असल्याचे जुन्या नकाशात आहे. मात्र आता, हे क्षेत्र वगळून ते निळ्या पूररेषेबाहेर दाखवले आहे. त्याचबरोबर रहाटणी इथंही असाच प्रकार झाला झाला आहे. निळ्या रेषेचा मार्गच बदलल्याचे उघड झाले. याबाबत सूज्ञ नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

















