- महापालिका आयुक्तांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२५) :- शहरातील लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे मोठ्या सोसायट्यांना पाण्याचा पुर्नवापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरातील १८४ सोसायट्यांमधील एसटीपी (सांडपाणी प्रकल्प) बंद आहेत. त्यांना तीन वेळा नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, तरीही शहरातील ५० सोसायट्यांनी समाधानकारक खुलासा न केल्याने १ जूनपासून त्या सोसायट्यांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तसे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत.
शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही वाढू लागली आहे. सद्यःस्थितीत शहरवासीयांना ६२० ते ६३० एमएलडी पाणी एकदिवसाआड दिले जात आहे. मात्र, त्यानंतरही अनेक बड्या सोसायट्यांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.
महाराष्ट्र शासनाने २ डिसेंबर २०२० च्या नवीन एकत्रित बांधकाम व विकास नियमावलीनुसार (युडीसीपीआर) राज्यातील २० हजार चौरस मीटर, त्यावरील मोठ्या क्षेत्रफळाच्या बांधकामांना, १०० सदनिका असलेल्या दीड हजार चौरस मीटर बांधकाम असलेल्या किंवा दररोज २० हजार लिटर पाण्याचा वापर करणाऱ्या हाऊसिंग सोसायटी, शैक्षणिक संस्था, औद्योगिक, व्यापारी, सरकारी व निमसरकारी संस्था, हॉटेल्स यांना पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या सोसायट्यांना एसटीपी उभारणे बंधनकारक आहे. सोसायटीने दररोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रकिया करून त्या प्रकिया केलेल्या पाण्याचा उद्यानातील झाडे व रोपे, सोसायटीच्या आवारातील स्वच्छता, वाहने धुणे आदी कारणासाठी वापर करणे अपेक्षित आहे. प्रकिया केलेल्या पाण्याचा वापर झाल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी कमी होऊन, शहरातील पाणीपुरवठ्याचा वाढता ताण कमी होण्यास मदत होणार आहे. एसटीपी उभारून पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या सोसायट्यांना महापालिकेकडून मिळकतकर बिलात सवलतही दिली जाते. मात्र, त्यानंतरही सोसायटीधारक एसटीपी सुरू करत नाहीत. त्यामुळे महापालिकेने आता कठोर भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे.
पुनर्वापर व पुर्नचक्रीकरण करणे बंधनकारक आहे. एसटीपी न उभारणाऱ्या सोसायट्या आणि आस्थापनांवर कारवाईचे अधिकार महापालिकेस देण्यात आले आहेत. शहरात ४५६ बड्या सोसायट्या आहेत. यामधील २६४ सोसायट्यांमधील एसटीपी सुरू आहेत. तर १८४ सोसाट्यांमधील एसटीपी विविध कारणांनी बंद असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ८४ सोसायट्यांना पहिली, ५० सोसायट्यांना दुसरी तर त्याच ५० सोसायट्यांना तिसरी नोटीस बजाविली आहे. त्यानंतरही या सोसायट्या खर्चाच्या कारणासह विविध कारणे देत एसटीपी बंद ठेवत आहेत. तर, आठ सोसायट्यांनी महापालिकेच्या पथकास सोसायटीमध्ये प्रवेशच दिला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे १ जूनपासून या सोसायट्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
मोठ्या सोसायट्यांना एसटीपी सुरू करण्याबाबत वारंवार आवाहन केले. अनेक सोसायट्यांनी विविध कारणे देत एसटीपी सुरू करण्यास टाळटाळ केली आहे. तीन वेळा नोटीस देऊनही सकारात्मक प्रतिसाद न दिलेल्या ५० सोसायट्यांचे पाणी बंद करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत सोसायट्यांनी एसटीपी कार्यान्वित करून ही कटू कारवाई टाळावी.
– शेखर सिंह, मनपा आयुक्त…















