- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच नुकसान झाल्यास सरकार जबाबदार?..
- शासकीय दाखले ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पध्दतीने तात्काळ द्या..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२५) :- निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांच्या रांगा दिसून येत आहेत आणि अशातच महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी २६ मे ते ३ जून या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. नेमके याच काळात प्रवेश प्रक्रिया वेग घेत असल्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी जातीचा दाखला, डोमिसाईल दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र यांसारख्या विविध शासकीय कागदपत्रांची गरज भासत असते. हे सर्व दस्तऐवज मिळवण्यासाठी नागरिक तहसील कार्यालयात येत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्रवेशासाठी आवश्यक दाखले मिळविण्याच्या
प्रक्रियेत मोठा विलंब होत आहे. अनेकांची कामे अपूर्णच राहिली असून नागरिकांचा वेळ वाया जात आहे. आता यातच शासनाच्या संकेतस्थळाचे तांत्रिक कामामुळे बंद होणे म्हणजे नागरीकांच्या संयमाची परीक्षाच पाहण्यासारखे झाले आहे. संकेतस्थळ बंद असल्यामुळे कोणतेही शासकीय प्रमाणपत्र उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे मिळविणे अशक्य झाले आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबले असून, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
काम होत नसल्याने नागरिकांनी तहसील कार्यालयात येणेच बंद केले आहे. त्यामुळे तहसील कार्यालयात सध्या शुकशुकाट आहे, नागरिकांना डिजिटल सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असले तरी सध्या तेच सामान्यांच्या डोकेदुखीचे कारण ठरत आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू असताना संकेतस्थळच बंद झालंय. त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तात्काळ पर्याय उपलब्ध करून द्यावे. दाखल्यांसाठीची ऑनलाइन प्रक्रीया बंद असल्याने ते ऑफलाइन पध्दतीने द्यावेत, अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
संकेतस्थळ अद्ययावत केले जात असल्याने दाखल्यांचे काम काहीसे मंदावले आहे. मात्र संकेतस्थळ बंद होण्यापूर्वी दाखल झालेल्या प्रकरणांवर काम सुरू असून, अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले जात आहे.
– जयराम देशमुख, अपर तहसीलदार…