तीन मोबाइल फोन, शस्त्र परवाना, पिस्तूल, पासपोर्ट जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२५) :- वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी आठ दिवस फरारी असलेला निलेश चव्हाण याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला मंगळवार, ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावणे, तिच्या मुलाला बळजबरीने ठेवणे आणि शस्त्र दाखवून धमकी देणे असे गंभीर आरोप निलेश विरोधात होते. १७ मे रोजी त्याच्यावर बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तिच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी २३ मे रोजी कलमवाढ करून त्याला सहआरोपी करण्यात आले. त्यानंतर तो फरार झाला. २९ मे रोजी त्याच्या मालमत्तेवर जप्तीची नोटीस जारी झाली. ३० रोजी त्याला अटक करून त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले.
शशांक आणि वैष्णवी यांच्या लग्न बैठकांत तसेच दोघांच्या वादात नीलेशचा सहभाग होता. वैष्णवीचा सासरा राजेंद्र, दीर सुशील यांच्या मदतीने सासू, लता, नणंद करिष्मा यांचे मोबाइल त्याने नेले. या सर्वांना समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे (५४), दीर सुशील हगवणे (२७) यांना यापूर्वी न्यायालयाने ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यांना शनिवारी (३१ मे) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या पोलिस कोठडीत ३ जूनपर्यंत वाढ करण्यात आली. नीलेश, राजेंद्र आणि सुशील हगवणे यांची पोलिसांना समोरासमोर चौकशी करता येणार आहे. पोलिस आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत, असे वाटत असल्याने फरार असलेला नीलेश चव्हाण निश्चिंत होता. पोलिसांनी ठावठिकाणा शोधून त्याला पकडले. पोलिसांना पाहताच ‘साहेब, मला अस्वस्थ वाटतंय…’ असे त्याने सांगितले.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विविध पथकांकडून नीलेशचा शोध सुरू झाला. गुन्हे शाखा, सायबर पोलिस यांच्यासह बावधन पोलिसही मागावर होते. त्याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना चकवा देण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरल्या. यात मोबाइल फोन बंद ठेवणे, कोणाशीही संपर्क न ठेवणे, सतत ठिकाण बदलत राहणे, असे तो करत होता. या काळात तीन मोबाइल फोनचा वापर केला. या फोनवरून तो सोशल मीडियाद्वारे या प्रकरणातील माहिती जाणून घेत होता. नीलेशकडे रोख स्वरूपात असलेली रक्कम तो खर्च करत होता. मात्र, ती जास्त दिवस रहावी म्हणून तो जपून खर्च करत होता. त्यासाठी कमी दर असलेल्या हॉटेलमध्ये तो राहात होता. पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्यासारखे नीलेशने सांगितले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला थेट विमानाने शहरात आणले.
दरम्यान शनिवारी पोलिस कोठडी सुनावल्यानंतर बावधन पोलिसांनी नीलेश चव्हाणला त्याच्या पुण्यातील कर्वेनगर येथील घरी नेऊन तपास केला. तेथून तीन मोबाइल फोन, शस्त्र परवाना, पिस्तूल, पासपोर्ट जप्त करण्यात आले. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणे या तिघांचे मोबाइल फोन नीलेशच्या घरात मिळून आले. ते पोलिसांनी जप्त केले. घरातून नीलेशचे पारपत्र (पासपोर्ट), शस्त्र परवाना आणि पिस्तूलही जप्त करण्यात आले. नीलेश चव्हाणला अटक केली, त्यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी तीन मोबाइल जप्त केले होते. ते तोच वापरत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या मोबाइलवरून तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले, याचा तपास करण्यात येणार आहे. त्याने नेपाळचे सीमकार्ड घेऊन नेपाळी मोबाइल क्रमांक घेतल्याचेही समोर येत आहे.