न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२५) :- सहकारी गृहरचना संस्थेमधील मैलाशुद्धीकरण केंद्र बंद असल्यास संबंधित सोसायटीचे पाण्याचे कनेक्शन तोडण्यात येईल, अशा नोटिशा महापालिकेकडून प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, या कारवाईला विरोध दर्शवत सोसायटी फेडरशनने महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. अशा प्रकाराची कारवाई केल्यास या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
शहरातील सहकारी गृहरचना संस्थेमधील मैलाशुद्धीकरण केंद्र काही कारणास्तव बंद आहेत. त्यांचे पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आणि अत्यावश्यक बाब असल्याने नळकनेक्शन तोडू नये. काही सहकारी गृहरचना संस्थेमधील मैलाशुद्धीकरण केंद्र बांधकाम व्यावसायिकांच्या चुकीमुळे बंद आहेत. मात्र, त्याची शहानिशा न करता पालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने १ जूनपासून नळ कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत.
काही सोसायट्यांचे मैलाशुद्धीकरण केंद्र बंद आहेत. त्यांच्या अडचणी समजून घेऊन बांधकाम व्यवसायिकांनी निकृष्ट दर्जाचे बसवलेले मैलाशुद्धीकरण केंद्र यावर विकसकावर कारवाई करावी. या प्रश्नांवर चर्चा करून समन्वयाने यातून मार्ग काढावा, परंतु नळ कनेक्शन तोडू नये, अन्यथा लोकशाही पद्धतीने या सर्व गोष्टींना विरोध करून आंदोलन केले जाईल, असा इशारा चिखली, मोशी, पिंपरी, चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने पत्राद्वारे दिला आहे.











