न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२५) :- मालमत्ताकराच्या बिलासाठी दिलेले एकूण १० कोटी १५ लाख रुपये रकमेचे धनादेश (चेक) बाउन्स झाले आहेत, त्या मालमत्ताधारकांनी महिन्याभराच्या आत संबंधित रक्कम जमा न केल्यास कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे.
शहरात निवासी, औद्योगिक, व्यावसायिक, मोकळ्या जमीन आणि मिश्र अशा ६ लाख ३२ हजार मालमत्तांची महापालिकेकडे नोंद आहे. मालमत्ताधारकांकडून महापालिका दरवर्षी मालमत्ताकराची वसुली करते. अनेक मालमत्ताधारक महापालिकेला ऑनलाइन माध्यमातून कर भरतात, तर, काही जण रोख, डीडी तसेच, चेकद्वारे बिल भरतात.
मागील सन २०२४-२५ मालमत्ताधारकांनी मालमत्ता जप्तीची कारवाई होऊ नये, म्हणून करसंकलन विभागाकडे चेकद्वारे बिल भरले होते. गेल्यावर्षी एकूण ९६६ कोटी रुपयांचे उत्पन्न करसंकलन विभागास मिळाले. मात्र, तब्बल १० कोटी १५ लाख रुपयांचे एकूण ७८० चेक बाउन्स झाले आहेत.
महापालिकेचे १८ विभागीय करसंकलन कार्यालय आहेत. सर्वाधिक २३५ चेक बाउन्सचे प्रकार थेरगाव कार्यालयात झाले आहेत. भोसरीत ९७, चिंचवडमध्ये ८५, चिखलीत ६८, निगडी-प्राधिकरणात २५, आकुर्डीत १४, सांगवीत २८, पिंपरी वाघेरे येथील १६, पिंपरी कॅम्प येथील २६, महापालिका भवन येथील २३, फुगेवाडी-दापोडीतील १७, च-होलीतील १८, मोशीतील १८, तळवडे येथील २९, किवळेतील १७, दिघी बोपखेल येथील २६, वाकड येथील १६, कस्पटे वस्तीतील २२ असे एकूण १० कोटी १५ लाख रुपयांचे ७८० धनादेश बाउन्स झाले आहेत.
मागील सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ताकरापोटी प्राप्त झालेल्या चेकपैकी १० कोटी १५ लाख रुपयांचे ७८० चेक बाउन्स झाले आहेत. ज्या मालमत्ताधारकांचे धनादेश बाऊन्स झाले आहेत, त्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत, त्यांना पैसे भरण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्या नागरिकांकडून चेक घेतला जाणार नसून, ऑनलाईन किंवा रोखीनेच बिलाचा भरणा करून घेण्यात येणार आहे. दिलेल्या मुदतीत कराचा भरणा न केल्यास मालमत्ता जप्त करून दिवाणी कारवाई केली जाणार आहे, असे करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.











