न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०१ जून २०२५) :- पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूलजवळ एका कारचालकाने १२ जणांना उडविले. ही घटना शनिवारी (दि. ३१) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. अपघातामध्ये नऊ जण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील तिघांना फॅक्चर झाल्याने संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर उर्वरित जखमींना शेजारील रुग्णालयातच दाखल केले आहे.
चालक जयराम शिवाजी मुळे (वय २७, रा. बिबवेवाडी) तसेच त्याचा साथीदार राहुल गोसावी यांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघेही मद्यधुंद असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जखमी विद्यार्थी एका चहाच्या टपरीवर चहासाठी एकत्रित आले होते. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने बारा जणांना धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार बारा जणांपैकी तिघांना संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर अन्य नऊ किरकोळ जखमी झाले. त्यांना योगेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कारचालकाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात नेले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातातील जखमी विद्यार्थी काही सोलापूर, बीड आणि इतर शहरातील आहेत. किशोर हरिभाऊ भापकर (वय ५७), पायल आवेशकुमार दुर्गे (वय २६), गुलनाज सिराज अहमद (वय २३), सोनाली सुधाकर घोळवे (वय ३०), मंगेश आत्माराम सुरूसे (वय ३३), अमित अशोक गांधी (वय ४५), समीर श्रीपाद भालकीकर (वय ४५), सोमनाथ केशव मेरुकर (वय २८), प्रशांत ब्रह्मदेव बंडगर (वय ३०), अविनाश फाळके, प्रथमेश पतंगे, संदीप खोपडे अशी त्यांची नावे आहेत.


















