न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०३ जून २०२५) :-राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या प्रभागरचनेचे काम आठवडाभरात सुरू करण्यात येणार आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत नगरविकास विभाग आदेश काढणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत. त्यामध्ये २९ महापालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समित्यांचा समावेश आहे. कोरोना, प्रभागरचना आणि नंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका लांबल्या आहेत. प्रभागरचना करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने हे अधिकार आपल्याकडे घेतले.
राज्य शासन प्रभागरचना करेल. ही रचना अंतिम मान्यतेसाठी आयोगाकडे येईल. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग आरक्षण काढेल. आयोगाकडून प्रभागनिहाय मतदार यादी तयार केली जाईल. प्रभाग रचना झाल्यावर मतदारसंख्या आणि मतदान केंद्रांची संख्या निश्चित होईल. याच्या आधारावर किती ईव्हीएम लागणार, याचा अंदाज घेतला जाईल. त्यानंतर निवडणूक जाहीर केली जाईल. राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या ६५ हजार ईव्हीएम आहेत. या निवडणुकांसाठी १ लाख ईव्हीएमची गरज.