न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांचे हेल्थकार्ड काढले जाते. हेल्थकार्ड प्रणालीची देखभाल व दुरूस्तीचे काम खासगी एजन्सीमार्फत केले जाते. त्या कामासाठी निविदा न काढता त्याच संस्थेला सातत्याने मुदतवाढ देण्यात येत आहे. आता पुन्हा त्याच संस्थेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
महापालिका रूग्णालयात वैद्यकीय उपचार घेत असलेल्या रूग्णांचे हेल्थकार्ड काढले जाते. हेल्थकार्डमध्ये रूग्णांचे आजार व औषधोपचाराची माहिती संकलित असल्याने रूग्णांवर नव्याने उपचार करणे डॉक्टरांना सुलभ जाते. त्यामुळे हेल्थकार्ड सेवेचे स्वागत करण्यात आले. हेल्थकार्ड प्रणालीची देखभाल व दुरूस्ती साठी अमृता टेक्नॉलॉजी ही खासगी एजन्सी काम पाहत आहे. या एजन्सीच्या कामाची पाच वर्षांची मुदत १४ जुलै २०१७ ला संपली. त्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने निविदा न काढता त्या एजन्सीला सातत्याने चार वेळा मुदतवाढ दिली.
एक ऑगस्ट २०२४ ते ३१ मार्च २०२५ अशी ९ महिने कालावधीची मुदतवाढ त्या एजन्सीला देण्यात आली. ती पाचवी मुदतवाढही संपली. त्यामुळे त्या एजन्सीला पुन्हा ६ महिन्यांची सहावी मुदतवाढ देण्यात आली आहे. ती मुदत १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२५ अशी आहे. त्या एजन्सीला ३ महिन्यांसाठी २१ लाख २३ हजार ९२१ रूपये शुल्क दिले जाते. सहा महिन्यासाठी एकूण ४२ लाख ४७ हजार ८४२ रूपये शुल्क देण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
















