न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जून २०२५) :- शहरातील शंभरहून अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करण्याबाबत तीन वेळा नोटिसा बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ५० सोसायट्यांवर पहिल्या टप्प्यात महापालिकेने सोमवारपासून (दि.२) कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांत पाच सोसायट्यांचे नळजोड बंद करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यःस्थितीत शहरवासीयांना ६२० ते ६३० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी दिवसाला दिले जाते. वाढत्या लोकसंख्येला हे पाणी पुरत नाही. मागील सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. लोकसंख्या वाढली, मात्र पाण्याची उपलब्धतता वाढली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होते. फेब्रुवारी उजाडताच सोसायट्यांचे बोअरवेल कोरडे पडतात. त्यामुळे अनेक मोठ्या सोसायट्यांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.
एकत्रित बांधकाम व विकास नियमावलीनुसार (युडीसीपीआर) २० हजार चौरस मीटरपुढील क्षेत्रफळावरील, शंभर सदनिका आणि दररोज २० हजार लिटर पाण्याचा वापर करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना पाण्याचा पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिकेकडून वारंवार लेखी सुचना देऊनही काही सोसायट्यांनी एसटीपी सुरू केले नाहीत, त्यामुळे महापालिकेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. सोसायटीधारकांचे धाबे दणाणले आहे.
एसटीपी बंद असलेल्या ५० सोसायट्यांचे नळजोड बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. उर्वरित १३४ सोसायट्यांना तिसरी नोटीस देण्यात येत आहे. ती दिल्यानंतर सात दिवसांनी या सोसायट्यांचे नळजोडही बंद केले जाणार आहेत.
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता…












