- विरोधकांच्या आयोगाच्या आदेशाकडे नजरा..
- तर, शहर भाजपकडे इच्छुकांची यादी तयार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२५) :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्या आदेशाला महिना होत आला तरी, अद्याप त्याबाबतची अधिसूचना निवडणूक आयोगाने काढलेली नाही. त्यामुळे निवडणूक कधी होणार, याबाबत माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे.
दुसरीकडे मात्र, पिंपरी चिंचवड शहरात सत्ताधारी भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्या तुलनेत विरोधी पक्ष पुरता ढेपाळला आहे. त्यांच्या आयोगाच्या आदेशाकडे नजरा खिळलेल्या असतानाच भाजपच्या उमेदवारांच्या नावांची यादीही अंतिम झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिका, जिल्हा परिषदांना एक पत्र पाठवते होते. त्यात जून अखेरपर्यंत वॉर्ड, प्रभाग तसेच गण गट रचना करून घेण्याचे आदेश दिले होते. निवडणूक आयोगानुसार पहिल्या टप्प्यात उत्तर व दक्षिण महाराष्ट्रात, दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा तर तिसऱ्या टप्प्यात, मुंबई, ठाणे आणि कोकणात मतदान होण्याची शक्यता निवडणूक आयुक्तांनी वर्तविली होती. जून संपायला फक्त वीस दिवस बाकी असताना अद्याप देखील निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी होत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
एकाच टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ईव्हीएमची गरज भासणार आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडे फक्त ६५ हजार ईव्हीएम असल्यामुळे तीन टप्प्यात निवडणूक घेण्याची तयारी आयोग करत असल्याची माहिती मिळत आहे.
पक्ष कायम सक्रीय आहे. सध्या विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. या आठवड्यात निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होऊ शकते. तीन टप्यात राज्यात निवडणूका होऊ शकतात. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक पहिल्याच टप्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही तयारीला लागलो आहोत. – शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष – भाजपा…