न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातील उपायुक्त, सहायक आयुक्तांच्या कामकाजात बदल करण्यात आले आहे. रिक्त असलेल्या शिक्षण, नगरसचिव, कायदा या विभागांना विभागप्रमुख मिळाले आहेत. अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या नगरसचिवपदी अखेर सहायक आयुक्त मुकेश कोळप यांची नियुक्ती झाली आहे.
उपायुक्त सीताराम बहुरे यांच्याकडे एलबीटीसह भूमि व जिंदगी विभागाचे कामकाम देण्यात आले आहे. उपायुक्त राजेश आगळे यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभाग आणि ई क्षेत्रीय कार्यालयासह कायदा विभागाचे अतिरिक्त कामकाज सोपविण्यात आले आहे. समाज विकास विभागाचे सहायक आयुक्त तानाजी नरळे यांच्याकडे शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्य शासनाकडून मागील आठवड्यात प्रतिनियुक्तीवरील महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तसेच, महापालिका सेवेतील काही अधिकारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे अनेक विभागांना अधिकारी मिळाले नव्हते. आयुक्त शेखर सिंह यांनी आदेश काढून अधिकाऱ्यांना कामकाजाचे वाटप केले.
अतिरिक आयुक्त उल्हास जगताप हे गेल्या वर्षी जून महिन्यात सेवानिवृत्त झाले. त्यानंतर नगरसचिव पद हे रिक्तच होते. अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे नगर सचिव पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. इंदलकर हे ३१ मे रोजी निवृत्त झाले. त्यामुळे ते पद रिक्त होते. भूमि आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप यांच्याकडे नगर सचिव विभागाचे कामकाज सोपविण्यात आले आहे.


















