न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १० जून २०२५) :- हप्त्यावर मोबाइल खरेदीसाठी दिलेल्या कागदपत्रांचा वापर करून कोथरूड भागातील महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. महिलेने दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून महागडा मोबाइल संच आणि टॅबलेट खरेदी करण्यात आला. पोलिसांकडून प्रतीक्षा चौरे (२७, तिलक रेसिडेन्सी, सेक्टर ७, इंद्रायणीनगर, भोसरी) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला वनाज मेट्रो स्थानकात सुरक्षारक्षक आहे. २०२२ मध्ये कोथरुड भागातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री करणाऱ्या दुकानातून तिने मोबाइल हप्त्यावर खरेदी केला होता. त्यावेळी हप्त्यावर मोबाइल खरेदीसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स दिली होती.
तेथे कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या खासगी बँकेच्या प्रतिनिधी प्रतीक्षा चौरेला कागदपत्रे देण्यात दिली होती. आठ महिन्याने महिलेच्या खात्यातून मोठा हप्ता कापण्यात आला. हप्ता भरल्यानंतर महिलेने बँकेत जाऊन विचारणा केली. महिला आणि तिच्या पतीने प्रतीक्षा चौरेची भेट घेतली. तेव्हा तिने मोबाइल खरेदीसाठी दिलेल्या कागदपत्रांचा दुरुपयोग केल्याची कबुली दिली.















