न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दिघी (दि. १० जून २०२५) :- दिघी येथे झाडांच्या फाद्यांची छाटणी करून २० झाडे मुळा सकट काढण्यात आली. याबाबत महापालिका उद्यान विभागाने प्रत्यक्ष जागेचा पंचनामा करून संबंधित जागा मालकाला नोटीस पाठविली आहे; तसेच संबंधितावर ९ लाख ६० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.
दिघी येथील श्री काशीमठ संस्थानची जागा आहे. या जागेवर नारळ, सुपारी, तुती, साग, आवळा, बदाम, अंबाडी, काजू, अशा विविध प्रकारचे वृक्ष लावले होते. ही झाडे जेसीबीच्या सहाय्याने जागा मालकाकडून काढण्यात आली. वृक्षतोड करताना महापालिकेच्या उद्यान विभागाकडून कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती.
महापालिकेकडून उद्यान सहायक आणि सहायक उद्यान अधीक्षक यांनी २४ डिसेंबर २०२४ रोजी जागेवर २० झाडाचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी जाऊन पाहणी अहवाल तयार करून तो अहवाल सादर करण्यात आला. दरम्यान, महापालिकेच्या उद्यान विभागाने विनापरवानगी वृक्ष तोडल्याने महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम १९७५ मधील कलम २१ मधील तरतुदीचे उल्लंघन केल्याने एका वृक्षास ५० हजार आणि फांद्या तोडल्याचे १० हजार रुपये प्रमाणे २० झाडांचे एकूण ९ लाख ६० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.














